शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 7 ऑक्टोबर 2021 (13:58 IST)

'नरबळी नाही, साडेपाच वर्षांच्या मुलाची वडिलांनीच केली हत्या'

- स्वाती पाटील
कोल्हापूर जिल्ह्यात साडेपाच वर्षाच्या बालकाची वडिलांनीच हत्या केल्याची घटना समोर आली आहे. आधी हा प्रकार कथित नरबळी असल्याचा संशय व्यक्त केला जात होता.
 
पण पोलिसांनी तपास करत सत्य समोर आणलं आहे.
 
"वारणा कापशीमधल्या या मुलाची हत्या राकेश केसरे या मुलाच्या वडिलांनीच केली. थंड डोक्याने केलेली ही हत्या आहे. पत्नीवर असलेल्या रागातून त्यांनी ही हत्या केली. पत्नीच्या प्रेमसंबंधांमुळे पतीपत्नी मध्ये वादावादी झाली. पतीचा मुलावर राग होता. मुलगा अनैतिक संबंधमधून झाला असल्याचा संशय पतीला होता. त्यातून मुलगा आणि वडील हे दोघेच घरात असताना भांडणातून त्यांनी हे कृत्य केल्याची कबुली वडिलांनी दिली आहे," अशी माहिची पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी दिली आहे.
 
मुलाची आई आणि आजीवर हत्येचा संशय यावा यासाठी हळद, कुंकू आणि गुलाल टाकत भानामतीचा बनाव नंतर त्यांनी रचला, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
 
रविवार (3 ऑक्टोबर) मुलाचा शोध लागत नसल्याने अपहरणाची शक्यता वर्तविण्यात आली होती. पण मंगळवारी (5 ऑक्टोबर) पहाटे घराच्या मागील बाजूस मुलाचा मृतदेह सापडल्याने हळहळ व्यक्त होत होती.
 
मुलाचा मृतदेह हळद कुंकू लावून फेकण्यात आला होता. त्यामुळं काही माध्यमांनी नरबळीची शक्यता वर्तवली होती.
 
हा मुलगा आपल्या मोठया भावासोबत गावातच आजोळी खेळायला गेला होता. तिथून संध्याकाळी पाचच्या सुमारास तो घरी परतण्यासाठी निघाला मात्र सात वाजले तरी तो घरी परतला नसल्याने सगळ्यांनी त्याची शोधाशोध सुरू केली होती, असं सांगण्यात आलं होतं.
 
अखेर रात्री अकरा वाजता घरच्यांनी पोलिसात तक्रार दाखल केली.
 
दुसऱ्या दिवशी दिवसभर पोलीस आणि गावकऱ्यांनी गावात आणि आसपास या मुलाचा शोध घेतला. मात्र त्याचा शोध लागला नाही. अखेर मंगळवारी पहाटे सहा वाजता घराच्या मागे त्याचा मृतदेह सापडला होता.
 
अज्ञातांविरोधात गुन्हा
हा मुलगा बेपत्ता झाल्यानंतर 3 ऑक्टोबर रोजी रात्री उशिरा शाहूवाडी पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्या दृष्टीने सोमवारी दिवसभर त्याचा शोध घेण्यात आला. मात्र, मंगळवारी पहाटे या मुलाचा मृतदेह सापडल्याने अज्ञात व्यक्तिविरुद्ध 302 अंतर्गत खुनाच्या गुन्ह्याची नोंद करण्यात आली होती.
 
या प्रकरणी अंधश्रद्धा निर्मूलन समितीने देखील पोलीस अधीक्षकांकडे निवेदन देत सखोल चौकशीची मागणी केली होती.
 
"शाहूवाडी तालुक्यातील वारणा कापशी इथं अल्पवयीन मुलाचा खून झाल्याची घटना प्रथम दर्शनी नरबळी प्रकाराची असल्याची माहिती समोर येत आहे त्यामुळे या प्रकरणी स्वतंत्र विशेष पथक नेमण्यात यावे," अशी मागणी अंनिसने केली होती.