शुक्रवार, 22 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 15 डिसेंबर 2022 (15:28 IST)

ऊसतोड मजुरांवर काळाचा घाला; ट्रक्टरसह ट्रॉली कालव्यात पलटून पाच जणांचा मृत्यू

death
करकंब येथील उजनी डावा कालव्याच्या 33 नंबर फाटय़ामध्ये ऊसतोड कामगारांचा ट्रक्टर कोसळून झालेल्या अपघातात दोन मायलेकरांसह पाच जण ठार झाले असून तीन जण जखमी झाले आहेत. मृत सर्वजण मध्यप्रदेशातील असून ट्रक्टर चालकाविरोधात करकंब पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
 
याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, मंगळवारी रात्री सव्वाअकाराच्या सुमारास उसाचा ट्रक्टर भरून कारखान्याकडे रवाना केल्यानंतर ऊसतोड कामगार ट्रक्टरच्या ट्रॉलीमधून (एमएच 45-Sme 1183) ते राहत असलेल्या मदने वस्तीकडे निघाले होते. यावेळी ट्रक्टर बागवान वस्तीजवळील डाव्या कालव्याच्या फाटय़ामध्ये कोसळला. यामध्ये ट्रॉली पूर्ण पलटी होऊन त्याखाली सर्व कामगार अडकले होते. कामगारांचा आरडाओरडा ऐकून आजूबाजूच्या लोकांनी अपघातस्थळी धाव घेतली. तर नागरिकांनी या अपघाताची माहिती पोलिसांना कळविली.
 
करकंब पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक महेश मुंडे आणि त्यांच्या सहकाऱयांनी तातडीने जेसीबीच्या साहाय्याने ट्रॉली बाजूला करून सर्वांना करकंब ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. पण त्याठिकाणी वैद्यकीय अधिकारी डॉ. तुषार सरवदे यांनी अरविंद राजाराम कदछे (वय 2), प्रिया नवलसिंह आर्या (वय 2), सुरीका वीरसिंग डावर (वय 16), रकमाबाई नवलसिंग आर्या (वय 23, सर्वजण रा. कोलके, ता. वरला, जि. बडवाणी, मध्यप्रदेश) यांना मृत घोषित केले. तर सोलापूरकडे उपचारासाठी नेत असतानाच सुनीता राजाराम कदछे (वय 23) या महिलेचा मृत्यू झाला. इतर जखमींवर पंढरपूर व सोलापूर येथे उपचार सुरू आहेत.
घटनेची माहिती समजताच करकंबच्या नागरिकांनी अपघातग्रस्तांना मदत केली. उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम यांनी करकंब ग्रामीण रुग्णालयास भेट देऊन घटनेची माहिती घेतली. पोलीस उपनिरीक्षक महेश मुंडे तपास करत आहेत.
 
चिमुकल्यांच्या मृत्यूने हळहळ
कष्ट करून पोटाची खळगी भरण्यासाठी ऊसतोडीच्या कामावर आलेल्या कामगारांवर अशाप्रकारे काळाने घाला घातल्याने सर्वत्र चिंता व्यक्त होत होती. परंतु, या अपघातामध्ये दोन चिमुकल्यांचाही अंत झाला. तर मृतांमध्ये अरविंद कदछे व सुनीता कदछे या मायलेकराचा समावेश असल्याने ही घटना अतिशय दुःखदायक होती.
 
Edited by: Ratnadeep Ranshoor