विधान परिषदेसाठी अर्ज दाखल केलेल्या चौघा उमेदवारांनी अर्ज मागे घेतले
विधान परिषद निवडणुकीसाठी दाखल झालेल्या एकूण १४ अर्जांपैकी चार उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले. तर, एक अपक्ष उमेदवाराचा अर्ज बाद झाला. एकूण नऊ जागांसाठी नऊच वैध अर्ज शिल्लक राहिल्याने ही निवडणूक बिनविरोध झाली. त्यामुळे शिवसेनेचे उमेदवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, नीलम गोऱ्हे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शशिकांत शिंदे, अमोल मिटकरी, तसंच काँग्रेसचे राजेश राठोड यांच्या विधान परिषद सदस्यत्वाचा मार्ग मोकळा झाला आहे.
भाजपाचेही चार उमेदवार बिनविरोध ठरले. मात्र आजच्या नाट्यमय घडामोडीत पक्षाचे अधिकृत उमेदवार डॉ. अजित गोपछडे यांनी आपला अर्ज मागं घेतला. त्यांच्या जागी काल डमी म्हणून अर्ज दाखल करणारे रमेश कराड यांचा अर्ज भाजपातर्फे कायम ठेवला. त्यामुळे कराड यांच्यासह रणजितसिंह मोहिते-पाटील, गोपीचंद पडळकर आणि प्रवीण दटके या चार भाजपा उमेदवारांची बिनविरोध निवड झाली.
आज अर्ज छाननीत अपक्ष उमेदवार शेहबाज राठोड यांचा अर्ज बाद झाल्या. त्यांच्या अर्जात सूचक आणि अनुमोदकांच्या सह्या नव्हत्या. तर, भाजपाचे संदीप लेले आणि अजित गोपचडे, तसंच राष्ट्रवादीचे किरण पावसकर आणि शिवाजीराव गर्जे यांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले.