गडकरी यांनी केली श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गाची पाहणी
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आळंदी आणि पंढरपूर या दोन धार्मिक स्थळांना जोडणाऱ्या श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गाची पाहणी केली. संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज या दोन्ही पालखी मार्गाचे सद्यस्थितीला ८५ टक्के काम पूर्ण झाले आहे. या पालखी महामार्गाची पाहणी केल्यानंतर नितीन गडकरी यांनी उजनी धरणाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मागणी केली आहे. नितीन गडकरी यांनी पालखी महामार्गाची पाहणी केल्यानंतर पत्रकार परिषद घेतली.
त्यावेळी ते म्हणाले की, आज उजनी धरणावरून आलो. माझी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना विनंती आहे की, एप्रिल-मे महिन्यात धरणातील पाणी कमी होते आणि पुणे-बंगळुरू रस्त्याकरीता रेती लागते. धरणातील जेवढा आपण गाळ काढू तेवढी धरणाची क्षमता वाढते. महाराष्ट्र सरकराने काही मार्ग काढला तर या धरणातील गाळ काढून याची नैसर्गिकरित्या क्षमता वाढेल, अशी विनंती मुख्यमंत्र्यांना करणार आहे.
देहू आणि आळंदी या ठिकाणाहून अनवाणी अनेक लोक पायी पंढरपूरला जातात. या नागरिकांच्या दृष्टीने पालखी मार्ग विस्तार करण्याचे ठरविले आणि ते लवकरच पूर्ण होणार आहे. त्या गोष्टीचा मला आनंद आहे. राज्य सरकारने एकूण २४ पालखी स्थळाच्या ठिकाणी १० हजार नागरिकांची व्यवस्था होईल अशा स्वरुपाचा हॉल बांधवा. इतर वेळी तो हॉल लग्न कार्यासाठी उपलब्ध करून द्यावा. त्यातून मेंटेनन्स मार्गी लागेल, असं नितीन गडकरी म्हणाले.
Edited By -Ratnadeep Ranshoor