आता काय शिवसेनेचा हात धरून युतीत आणायचे का ? – गिरीश महाजन
येत्या निवडणुकीत भाजप व शिवसेना दोन्ही पक्षांनी सोबत निवडणुका लढवाव्यात अशी आमची भूमिका स्पष्ट आहे. तरीही शिवसेना नियमितपणे स्वबळाचा नारा देतेय मग त्यांना काय हात धरून युतीत सामील व्हा सांगायचे का? असा प्रश्न राज्याचे जलसंपदा मंत्री आणि नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी उपस्थित केला. नाशिकरोड येथील विभागीय माहिती कार्यालयातील जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीनंतर माध्यमांशी बोलत होते.
महाजन पुढे म्हणाले ही जर युती झाली नाही तर आम्हीही स्वबळावर लढण्याची तयारी ठेवली आहे. आम्ही देखील स्वबळावर लढून सत्ता काबीज नक्की करू असे त्यांनी स्पष्ट केले. आम्ही पक्ष म्हणून समविचारी पक्षाशी भाजपने सर्वच ठिकाणी युती केलीय. महाराष्ट्रातही तसेच झाले. परंतु आता जर शिवसेना स्वबळाची भाषा करत असेल तर आम्ही त्यासाठी तयार आहोत. येत्या निवडणुकीत भाजप युती न करता निवडणुकीच्या रणांगणात उतरला तर विजय भाजपचाच होणार असल्याचा दावा त्यांनी याप्रसंगी केला आहे. राज्यातील मतांचे विभाजन टाळण्यासाठी युती व्हावी अशी इच्छा महाजन यांनी व्यक्त केली आहे.