राज्यात सुमारे 36 लाख नवीन मतदार
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात सुमारे 36 लाख नवीन मतदारांची भर पडणार आहे. त्यामध्ये तरुण मतदारांची संख्या अधिक असून तृतीयपंथीयसुध्दा आपला मतदानाचा अधिकार बजावण्यासाठी जागृत झाला आहे. राज्यभरात ऑक्टोंबर 2018 अखेर 2025 तृतीयपंथीयांची मतदार नोंदणी झाली आहे. राज्यात 1 सप्टेंबर 2018 ते 11 जानेवारी 2019 या कालावधीत मतदार नोंदणी अभियान सुरु आहे. आतापर्यंत 36 लाख नवीन अर्ज आले असून त्यामध्ये मागील नोंदणीच्या तुलनेत यंदा महिलांचे प्रमाण अधिक असल्याचे समजते.
निवडणूक कर्मचार्यांनी घरोघरी जाऊन ज्यांची नोंदणी नाही, पण मतदानासाठी पात्र असलेल्या व्यक्तींचा शोध घेतला. 1 जानेवारी 2019 रोजी अठरा वर्षे पूर्ण झालेले, घरातील व्यक्तीचे नाव दुसर्या मतदार यादीत असलेले, मयत व स्थलांतरीत झालेले, नावात दुरुस्ती व दिव्यांग मतदारांची यादी तयार केली आहे. तसेच ज्यांची नावे दोनपेक्षा अधिक मतदार यादीत आढळली, अशांची नावे वगळली आहेत. 11 जानेवारी 2019 रोजी अंतिम यादी तयार होण्याची शक्यता आहे. या यादीतील व्यक्ती मतदानासाठी पात्र असतील, असे एका निवडणूक अधिकार्याने सांगितले.