शनिवार, 4 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 21 ऑक्टोबर 2020 (16:27 IST)

मराठीतूनही समालोचन करा, मनसेचे डिस्ने हॉटस्टारला पत्र

डिस्ने हॉटस्टारवर भारतातील अन्य भाषांमध्ये आयपीएलचे समालोचन केले जाते. यामुळे मराठीतूनही समालोचन केले जावे, यासाठी मनसेने आता थेट डिस्ने हॉटस्टार कंपनीला पत्र पाठवले आहे. 
 
आता मनसेच्या कामगार सेनेचे चिटणीस केतन नाईक यांनी डिस्ने हॉटस्टार कंपनीला पत्र दिले आहे. डिस्ने हॉटस्टारच्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर अन्य प्रादेशिक भाषांसारखाच मराठी भाषेचाही पर्याय द्यावा, अशी मागणी केली आहे. आयपीएलचे समालोचन हिंदी, इंग्रजी, तेलगु, कानडी आणि बंगाली भाषेमध्ये केले जाते. मात्र, अॅपमध्ये मराठी नाही. तुमच्या कंपनीचे मुख्यालय मुंबईत आहे. आयपीएलचा मराठी प्रेक्षक वर्गही मोठा आहे. असे असताना तुम्हाला मराठीचा विसर पडल्याचे दिसत आहे, असे मनसेने म्हटले आहे. याबाबतचे ट्विट नाईक यांनी केले आहे. 
 
आयपीएल क्रिकेट सामन्यांची कॉमेंट्री मराठीत करण्यास कुठल्याही प्रकारची अडचण आली तर आम्ही आवश्यक ते सहकार्य करू, पण नुसतीच चालढकल केलीत तर महाराष्ट्र सैनिकांशी गाठ आहे हे लक्षात असुद्या, असा इशाराही दिला आहे. 
 
अन्य एका ट्विटमध्ये त्यांनी हॉटस्टारला मराठी समालोचक मिळत नसेल किंवा शोधण्यास अडचण आली तर मदत करण्याचे आश्वासनही दिले. क्रिकेट सामान्यांची कॉमेंट्री मराठी भाषेत का नसावी? महाराष्ट्रात एकापेक्षा एक असे उत्तम समालोचक आहेत. गरज असल्यास आम्ही शोधून देऊ, असे ते म्हणाले.