गोव्यातही धरणे ८० टक्क्यांवर…
राज्यात मागील काही दिवसांपासून पडत असलेल्या जोरदार पावसामुळे बहुतेक सर्व महत्त्वाच्या धरणांमधील पाण्याच्या पातळीत वाढ होऊन ती ८० टक्के भरली आहेत. या महिन्याच्या अखेरपर्यंत धरणे ओसंडून वाहू लागतील, अशी माहिती जलस्रोत मंत्री विनोद पालयेकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
धरणांच्या पातळीत वाढ झाल्याने तसेच पाण्याच्या मुबलक उपलब्धतेमुळे सिंचनात कुठलीही अडचण निर्माण होणार नाही. त्याचबरोबर शेतकऱ्यांनाना आवश्यक ते सहकार्य देण्यास जलस्रोत खाते नेहमीच तत्पर राहील, असेही पत्रकात म्हटले आहे.
आकडेवारीनुसार राज्यातील साळावली, अंजुणे, आमठणे, चापोली व पंचवाडी या पाच महत्त्वाच्या धरणांमधील पाण्याच्या पातळीत मागील काही दिवसांपासून पडत असलेल्या जोरदार पावसामुळे वाढ झाली आहे. या धरणांच्या पाण्याची पातळी वाढून ती 80 टक्क्यांहून अधिक झाली आहे. साळावली धरणाची क्षमता 41.15 मीटर इतकी असून 21 जुलै रोजी 40.24 मीटर पर्यंत धरण भरल्याची नोंद झाली आहे. गेल्यावर्षी याच दिवशी साळावली धरणाची ही पातळी 40.57 मीटर इतकी नोंद झाली होती.