रविवार, 26 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 10 मे 2021 (21:01 IST)

लोककलावंतांना अर्थसहाय्य देण्याबाबत शासन सकारात्मक- सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख

गेल्या जवळपास सव्वा वर्षाहून अधिक काळ महाराष्ट्र कोविंड संकटाशी लढत आहे. या काळात कोविड़चा संसर्ग वाढू नये यासाठी सांस्कृतिक कार्यक्रमांना राज्यात बंदी घालण्यात आली होती. यामुळे अनेक लोक कलावंतांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत होते. हे सर्व लक्षात घेऊन लोककलावंतांना अर्थसहाय्य देण्याबाबत राज्य शासन प्रयत्न करीत आहे. या संदर्भातील सर्वसमावेशक प्रस्ताव लवकरच करण्यात येत असल्याची माहिती सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी आज दिली.
 
महाराष्ट्रातील कलावंतांच्या विविध संघटनांच्या प्रतिनिधींना समवेत आज सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी ऑनलाइन बैठकीद्वारे संवाद साधला.
 
 सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख म्हणाले की, राज्य शासन लोककलावंतांना आर्थिक सहकार्य देण्यासाठी प्रयत्न करीत असून राज्यातील सर्व क्षेत्रातील लोककलावंतांना यात सामावून घेण्यात येईल. आर्थिक सहकार्य कसे करता येईल याबाबतचा प्रस्ताव तयार करण्यात येत असून यासाठी जिल्हाधिकारी यांची मदत घेण्यात येणार आहे. प्रत्येक जिल्ह्यातील लोककलावंतांचे सर्वेक्षण करण्यात येणार असून शासनाने मंजूर केलेले अर्थसहाय्य थेट या लोककलावंतांच्या खात्यात डीबीटी द्वारे जमा होणार आहे.
 
सांस्कृतिक विभागाचे सचिव सौरभ विजय यांनी सांगितले की, गेल्या वर्षी राज्यात कोविडचा  प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर चित्रीकरणाला परवानगी देण्यात आली होती. यासाठी नियमावली तयार करण्यात आली होती. आता सुद्धा राज्यात कोविडचा प्रादुर्भाव कमी झाल्यावर नियमावली तयार करण्यात येऊन यानंतर चित्रीकरण आणि लोककलावंतांना सांस्कृतिक कार्यक्रम करण्याची परवानगी देण्यात येईल.
 
या ऑनलाईन बैठकीस सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव सौरभ विजय,उपसचिव विलास थोरात, सांस्कृतिक संचालनालयाचे संचालक आणि सहसंचालक यांच्यासह रघुवीर खेडकर, बाळासाहेब गोरे, अरुण मुसळे,प्रदीप कबरे, उदय साटम,रत्नाकर जगताप, अनिल मोरे, शाहीर दादा पासलकर, विशाल शिंगाडे, संभाजी जाधव, शाहीर फरांदे ,विष्णू कारमपुरी, सुभाष साबळे, राजेश सरकटे आदी उपस्थित होते.
 
फड मालकांना अनुदान, लॉकडाऊन संपल्यानंतर कार्यक्रम सुरू करण्याची परवानगी, लोककलावंतांना रोख मदत, चित्रपटांना सरसकट अनुदान देण्यासंदर्भातील कार्यवाही, लोककलावंतांची नोंदणी, शासनामार्फत देण्यात येणारे अनुदान वेळेवर प्राप्त होणे,कलाकारांसाठी ओळखपत्र असे विविध मुद्दे यावेळी उपस्थित लोककलावंत प्रतिनिधींनी मांडले.