1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 14 जून 2023 (22:42 IST)

वर्ध्यातल्या बोगस बियाणांचं गुजरात कनेक्शन; 8 जणांना अटक

arrest
वर्धा इथे कपाशीची बोगस बियाणे तयार करणाऱ्या कारखान्यावर पोलिसांनी धाड टाकली. या धाडीत कारखान्यात गुजरातमधून आयात केलेले 1 कोटी 55 लाखांचे बोगस बियाणी जप्त करण्यात आले आहे.
 
शहरातील म्हसाळा परिसरात बोगस बियाणे तयार केले जात होते. एकूण 8 आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.
 
गेल्या काही दिवसांपासून म्हसाळा ग्रामपंचायत अंतर्गत अग्रग्रामी शाळेजवळ अवैध रित्या बोगस बियाणे तयार करण्याचा कारखाना सुरू होता. राजू जैस्वाल यांच्या राहत्या घरी बोगस बियाणे तयार करण्यात येत होते.
 
परिसरात रासायनिक दुर्गंधी पसरल्याने स्थानिकांनी पोलिसात तक्रार दिली. त्यामुळं या बोगस कारखान्याचे बिंग फुटलं. पोलिसांनी मध्य रात्री अचानक या कारखान्यावर धाड टाकली.
 
सदर कारखान्यात बोगस बियाणे निर्मितीचे साहित्य, नामांकित कंपनीचे रॅपर व मार्केटिंगसाठी असलेली वाहने आढळून आली.
 
गुजरात येथील विविध व्यापाऱ्यांकडून 29 क्विंटल बोगस बियाण्याचा माल याठिकाणी आणून पॅकिंग केला जात होता. त्यामधून 14 टन माल शेतकऱ्यांना विकला गेला असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
 
पोलीस अधीक्षक नरुल हसन यांनी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार "म्हसळा येथे बोगस बी टी बियाणांचा कारखाना सुरू होता. यावर सेवाग्राम पोलीस आणि लोकल क्राईम ब्रांच मिळून लगेचच छापा टाकण्यात आला. काही आरोपींकडून बोगस बियाणं तयार करण्यात येत होतं. तपासादरम्यान वेगवेगळ्या कृषी केंद्रामार्फत आणि खासगी कृषी केंद्रामार्फत हे बोगस बियाणं विकले जात होते".
 
"सदर बोगस बियाणं गुजरातच्या व्यापाऱ्यांकडून विकत घेतला जात होता. आरोपींनी आतापर्यंत सेलू, नागपूर, वर्धा, यवतमाळ आणि इतर ठिकाणी 14 टन बोगस बियाणांची विक्री केली जात होती. विविध कलमान्वये 15 आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे त्यापैकी 8 आरोपींना अटक करण्यात आले असल्याची माहिती त्यांनी दिली.
 
विदर्भातील जवळपासच्या जिल्ह्यात सगळीकडे या कारखान्यातून विक्री करण्यात आलेली बोगस बियाणांचा माल विकला गेला आहे. बोगस बियाणं विक्री केलेल्या ठिकाणांचा शोध पोलिसांचं पथक घेत आहेत.
 
बोगस बियाणे संदर्भात कृषी विभागाकडून महत्त्वाची सूचना जाहीर करण्यात आली आहे. त्यात त्यांनी कापूस बियाणे खरेदीची पावती असल्यास त्याच बियाण्याची लागवड करावी असे आवाहन शेतकऱ्यांना केले आहे.
 
आवाहन
1) वर्धा जिल्हयात बोगस कापूस बियाणे मोठया प्रमाणावर सापडलेले आहे त्या अनुषंगाने शेतकऱ्यांनी कापूस बियाणे खरेदी केल्याची पावती असल्यास त्याच बियाण्यांची लागवड करावी.
 
2) ज्या शेतकऱ्यांना कापूस बियाणे खरेदीची पावती प्राप्त झाली नसेल, त्या बियाण्यांची लागवड करु नये.
 
3) ज्या कृषि केंद्र धारकाकडून कापूस चे स्वस्त बियाणे प्राप्त झाले असेल, त्या शेतकऱ्यांनी विशेष काळजी घ्यावी.
 
4) बोगस किंवा स्वस्त बियाणे खरेदी केलेल्या शेतकऱ्यांनी कृषी विभागाला तत्काळ माहिती देण्याचे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.
 
कृषी अधीक्षक प्रभाकर शिवणकर यांनी दिलेल्या माहितीनुसार "गुजरात मधून बोगस बियाणे आणलेला ट्रक जप्त करण्यात आला आहे. तसेच या कारखान्यात विविध नामांकित कंपन्यांच्या 1 लाख 18 हजार पाकीट मध्ये बियाणे पॅक करण्याचं काम सुरू होत. ते जप्त करण्यात आले आहे".
 
बोगस बियाणे कसे ओळखायचे यावर शिवणकर म्हणतात "बियाणे बोगस आहेत की अप्रमाणित आहेत, त्याचे आम्ही सँपल तपासणी प्रयोगशाळेला टेस्टिंगला पाठवले जातात. अहवाल आला की गुन्हे दाखल केले जातात. मात्र या प्रकरणात आम्ही जनजागृती आणि विविध प्रसिद्धी माध्यमांद्वारे बोगस बियाणे संदर्भात माहिती पोहचवण्याचे काम करतो आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांनी कुठल्याही प्रलोभनाला बळी न पडता प्रमाणित बियाणे खरेदी करावे असे आवाहन कृषी विभागामार्फत केले जातात" अस शिवणकर म्हणाले.
 



Published By- Priya Dixit