उन्हाळ्याचा तडाखा जाणवू लागला की दोन प्रश्न हमखास विचारले जातात - यंदा उन्हाळा किती कडक असेल आणि पाऊस कधी येईल. हवामान विभागानं त्याचं उत्तर दिलं आहे. एप्रिल, मे आणि जून या महिन्यांसाठीचा दीर्घकालीन अंदाज हवामान विभागानं दिल्लीत भूविज्ञान मंत्रालयाच्या पत्रकार परिषदेत जाहीर केला आहे.
त्यानुसार महाराष्ट्रात एप्रिलमध्ये उष्णतेच्या लाटा येण्याची शक्यता आहे.
तसंच, एल निनो या पॅसिफिक महासागरातल्या प्रवाहाची तीव्रता मंदावली असून त्याचा मान्सूनवर काय परिणाम होईल, हेही हवामान विभागानं समजावून सांगितलं आहे.
उष्णतेच्या लाटांचा इशारा
यंदा फेब्रुवारी आणि मार्च महिन्यांत भारतात उष्णतेच्या लाटा नोंदवल्या गेल्या नाहीत.
पण या काळात महाराष्ट्रात बहुतांश भागांमध्ये कमाल तापमान नेहमीपेक्षा जास्त नोंदवलं गेलं. दक्षिण भारतातही या दोन्ही महिन्यांमध्ये तर मध्य भारतात मार्चमध्ये हीच स्थिती होती.
या उकाड्यातून मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाची इतक्यात सुटका होण्याचीही चिन्हं नाहीत. राज्याच्या या अंतर्गत भागांमध्ये एप्रिल महिन्यांत उष्णतेच्या लाटा येण्याची शक्यता असल्याचं हवामान विभागानं म्हटलं आहे.
(भारतीय हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार समुद्र किनाऱ्याजवळच्या प्रदेशात सलग दोन दिवस 37 अंश सेल्सियसपेक्षा जास्त कमाल तापमान नोंदवलं गेलं किंवा सलग दोन दिवस तापमानात नेहमीपेक्षा 4.5 अंशांहून अधिक वाढ झाली, तर उष्णतेची लाट आल्याचं मानलं जातं.)
महाराष्ट्रात एप्रिलच्या पहिल्या पाच दिवसांसाठीचा हवामानाचा अंदाज ज्येष्ठ हवामानशास्त्रज्ञ कृष्णानंद होसाळीकर यांनी पोस्ट केला आहे. त्यानुसार मराठवाडा आणि विदर्भातील काही ठिकाणी उष्णतेच्या लाटेसाठी यलो अलर्ट देण्यात आला आहे.
सोलापूर, उस्मानाबाद, लातूर आणि नांदेडमध्ये 1 आणि 2 एप्रिल रोजी तर अकोला, चंद्रपूर, यवतमाळ या जिल्ह्यांत चार एप्रिलनंतर उष्णतेच्या लाटेची शक्यता आहे.
उष्णतेच्या लाटेमुळे उष्माघात (हीटस्ट्रोक) होण्याची शक्यता असते. त्यामुळे या कालावधीत बाहेर पडताना लोकांनी विशेष काळजी घ्यायला हवी, असं भूविज्ञान मंत्रालयानं म्हटलं आहे.
निवडणुकीसाठी हवामानाचा इशारा
एप्रिलमध्ये महाराष्ट्राशिवाय गुजरात, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि पश्चिम मध्य प्रदेशातही उष्णतेच्या लाटांचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. तर मे महिन्यात उत्तर भारतातही पारा वर चढण्याची शक्यता असते.
यंदा याच काळात लोकसभा निवडणुका घेतल्या जाणार आहेत. त्यामुळेच हवामान विभाग आणि राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण (NDMA) यांनी निवडणूक विभागालाही सल्ला दिला आहे आणि योग्य काळजी घेण्यास सांगितलं आहे.
“निवडणुकीच्या काळात प्रचार, सभा, प्रत्यक्ष मतदान अशा गोष्टींसाठी लोक मोठ्या प्रमाणात बाहेर पडतील. त्यामुळे उष्णतेच्या लाटेशी निगडीत आजारपणांचा धोका वाढतो. मतदार आणि निवडणूक कर्मचाऱ्यांना त्याचा त्रास जाणवू शकतो आणि जीवालाही धोका निर्माण होतो.
निवडणूक आयोगानं या गोष्टी लक्षात ठेवून राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना मार्गदर्शन करावं. हवामान विभाग वेळोवेळी उष्णतेविषयी अंदाज वर्तवत राहील,” असं हवामान विभागानं म्हटलं आहे.
पक्षांसाठी कुठली वेगळी नियमावली जाहीर केलेली नाही. पण उन्हाळ्याच्या दिवसांत राजकीय सभांसारख्या मोठ्या आयोजनांमध्ये उष्णतेवर उपायांचा समावेश केला जावा, असं कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं.
एल निनो आणि पावसाचं काय?
पॅसिफिक महासागरातल्या एल निनो या प्रवाहाचा जगभरातल्या हवामानावर आणि भारतल्या मान्सूनवर परिणाम होताना दिसतो.
तीन वर्ष दडी मारल्यावर एल निनो 2023 मध्ये पुन्हा प्रकटला आणि तेव्हापासून जगभरात अनेक ठिकाणी तापमानानं उच्चांक गाठले. पण 2024 या वर्षाच्या सुरुवातीला मंदावल्याचं जागतिक हवामान संघटनेच्या तज्ज्ञांनी जाहीर केलं होतं.
भारतीय हवामान विभागानंही त्याला दुजोरा दिला आहे. एल निनो सध्या मध्यम स्वरुपात असून, तो येत्या काळात कमकवूत होत जाईल आणि मान्सूनच्या मध्यावर ला निना चा प्रभाव जाणवू लागेल, अशी माहिती हवामान विभागानं दिली आहे.
एल निनो आणि पावसाचं काय?
पॅसिफिक महासागरातल्या एल निनो या प्रवाहाचा जगभरातल्या हवामानावर आणि भारतल्या मान्सूनवर परिणाम होताना दिसतो.
तीन वर्ष दडी मारल्यावर एल निनो 2023 मध्ये पुन्हा प्रकटला आणि तेव्हापासून जगभरात अनेक ठिकाणी तापमानानं उच्चांक गाठले. पण 2024 या वर्षाच्या सुरुवातीला मंदावल्याचं जागतिक हवामान संघटनेच्या तज्ज्ञांनी जाहीर केलं होतं.
भारतीय हवामान विभागानंही त्याला दुजोरा दिला आहे. एल निनो सध्या मध्यम स्वरुपात असून, तो येत्या काळात कमकवूत होत जाईल आणि मान्सूनच्या मध्यावर ला निना चा प्रभाव जाणवू लागेल, अशी माहिती हवामान विभागानं दिली आहे.
Published By- Priya Dixit