रविवार, 5 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: रविवार, 19 जून 2022 (11:25 IST)

राज्यातील विविध ठिकाणी अति मुसळधार पावसाच्या सरी कोसळणार

mumbai rain 2
महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. येत्या काही तासात राज्यातील विविध ठिकाणी पावसाच्या सरी कोसळणार आहेत.
 
भारतीय हवामानशास्त्र विभागाचे वरिष्ठ शास्त्रज्ञ के एस होसाळीकर यांनी एक ट्वीट करत याबाबतची माहिती दिली. त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं की, “आजपासून राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असून काही भागात मध्यम ते मुसळधार पाऊस कोसळणार आहे. तसेच मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ आणि दक्षिण कोकणात सोमवारपासून अति-मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर मुंबईसह ठाणे आणि उत्तर कोकणात पावसाचा जोर वाढणार असल्याचंही त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं.

 कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात यलो अलर्ट सांगण्यात आला आहे. हवामान खात्यानं गडचिरोली वगळता सर्व जिल्ह्यात कमी अधिक पावसाची शक्यता वर्तवली आहे. सांगली, सातारा, कोल्हापूर, पुणे, सोलापूर, रायगड, अहमदनगर, धुळे, जळगाव, नाशिक, ठाणे, मुंबई, नागपूर, नंदुरबार आणि पालघर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
 
तर हवामान खात्याकडून मध्य महाराष्ट्रात औरंगाबाद, उस्मानाबाद, जालना, बीड, लातूर, हिंगोली, परभणी, नांदेड जिल्ह्यात यलो अलर्ट सांगण्यात आले आहे. 

या ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पुढील चार ते पाच दिवस राज्यात हवामान खात्यानं मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. राज्यात पावसाचा जोर वाढेल.