राऊत यांच्या जामिनावर तत्काळ स्थगिती देण्यास उच्च न्यायालयाचा नकार
संजय राऊत यांच्या जामिनावरील सुटकेचे आदेश देणाऱ्या विशेष PMLA न्यायालयाच्या आदेशावर त्वरीत स्थगिती देण्याची EDची मागणी उच्च न्यायालयाने फेटाळली. न्यायालयाने ईडीच्या अपिलावर गुरुवारी सुनावणी ठेवली आहे. विशेष पीएमएलए पत्राचाळ पुनर्विकास गैरव्यवहार प्रकरणी बुधवारी शिवसेना नेते संजय राऊत आणि प्रवीण राऊत यांची जामिनावर सुटका केली. या आदेशाला स्थगिती देण्याची विनंती ईडीने विशेष न्यायालयाला केली. मात्र, विशेष न्यायालयाने त्यांची विनंती फेटाळली. त्यामुळे विशेष न्यायालयाच्या आदेशाला स्थगिती मिळावी, यासाठी ईडीने उच्च न्यायालयात धाव घेतली. न्या. भारती डांग्रे यांच्या एकलपीठापुढे या याचिकेवर सुनावणी होती. दोन्ही बाजू ऐकल्याशिवाय आदेश देऊ शकत नाही, असे म्हणत न्या. डांग्रे यांच्या एकलपीठाने विशेष न्यायालयाच्या आदेशाला त्वरीत स्थगिती देण्यास नकार दिला.
मी विशेष न्यायालयाचा आदेशही वाचला नाही. कशाच्या आधारावर जामीन मंजूर करण्यात आला आहे, हे सुद्धा मला माहीत नाही. तसेच कशाच्या आधारावर तुम्ही (ईडी) या आदेशाला आव्हान देत आहात, ते ही माहीत नाही. प्रतिवाद्यांचे म्हणणे ऐकल्याशिवाय मी स्थगितीचा आदेश कसा देऊ? असे उच्च न्यायालयाने म्हटले.
Edited by: Ratnadeep Ranshoor