1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 29 सप्टेंबर 2021 (21:11 IST)

गुलाब चक्रीवादळ : मराठवाड्यात मुसळधार पाऊस; पैनगंगा नदीला पूर, जायकवाडीचे दरवाजे उघडले

पालघर जिल्ह्यात तुफान पाऊस सुरू आहे. मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील मस्तानाका परिसरात शिमला हॉटेल जवळ तसंच महामार्गावरील चिल्लर फाटा माउंटेन हॉटेल जवळही पुराचं पाणी आल्यामुळे मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक संथ गतीने सुरू आहे.
 
मुंबईतही जोरदार पाऊस सुरू आहे.
नाशिकमध्ये सलग 3-4 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे नाशिकमधली धरणं भरली आहेत. गंगापूर धरणातून मोठा विसर्ग सुरू आहे. आज (29 सप्टेंबर) दुपारी 15 हजार क्युसेकने विसर्ग सुरू होईल.
 
जायकवाडी धरणाचे दरवाजे उघडले
औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण येथील जायकवाडी धरणाचे 18 दरवाजे (रेडियल गेट) अर्धा फूट उघडण्यात आले आहेत. धरणातून 9432 क्युसेक एवढा विसर्ग गोदावरी नदीपात्रात सुरू आहे.
 
जायकवाडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस पडल्यामुळं धरणातील पाण्याची आवक वाढली. त्यामुळं बुधवारी (29 सप्टेंबर) सकाळी सातपर्यंत धरणातील पाणीसाठा 92.31% टक्क्यांवर पोहोचला. त्यात पाणलोट क्षेत्रात पावसाची शक्यता असल्यानं धरणात पाण्याची आवक वाढण्याची शक्यता पाहता, धरणाचे दरवाजे उघडण्यात आले आहेत. प्रशासनानं नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
औरंगाबादमध्ये मंगळवारी (28 सप्टेंबर) झालेल्या जोरदार पावसानंतर बुधवारी पावसानं विश्रांती घेतल्याचं पाहायला मिळालं.
 
पैनगंगा नदीला पूर
पैनगंगा नदीला पूर आल्याने मराठवाडयाचा विदर्भाशी असलेला संपर्क तुटलाय. इसापूर धरणाचे दरवाजे उघडून नदीत पाण्याचा विसर्ग केल्या जातोय, त्यामुळे पैनगंगा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ झालीय.
 
हदगांव जवळ असलेल्या पैनगंगा नदीच्या पुलावरून मोठया प्रमाणात वाहतेय, त्यामुळे नांदेड- नागपूर दरम्यान ची वाहतूक सकाळ पासून बंद करण्यात आलीय, त्यामुळे हदगांवसह उमरखेड शहराच्या जवळ वाहनांच्या रांगा लागल्या आहेत.
पैनगंगा नदीला आलेल्या या पुरामुळे हदगांव, हिमायतनगर आणि माहूर जिल्ह्यात अतिदक्षता बाळगण्याचे आवाहन प्रशासनाने केलय. दरम्यान, पैनगंगा नदीला आलेल्या या पुरामुळे नदीकाठच्या शेकडो हेक्टर जमिनी खरडून गेल्या आहेत, तर नदीला मिळणारे ओढे नाले तुंबल्याने शेतीचे मोठे नुकसान झालेय. 
 
मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांना मदत करा- देवेंद्र फडणवीस
पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तात्काळ मदत करा अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
 
ते म्हणाले, "राज्यात विशेषत: मराठवाड्यात पावसाने प्रचंड नुकसान झाले आहे. लाखो हेक्टरवर पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. राज्य सरकारने मराठवाड्यातील शेतकर्‍यांना तत्काळ मदत दिली पाहिजे. निसर्ग, तौक्ते ही दोन चक्रीवादळं आणि पुराची कोकणात अजून मदत मिळाली नाही.अशात मराठवाड्यासंदर्भात जी माहिती राज्य सरकारनेच दिली, ती अतिशय धक्कादायक आहे. यंदाच्या पावसाळ्यात 436 लोकांना आपले प्राण गमवावे लागले, यातूनच या स्थितीची भीषणता लक्षात येते. मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान झाल्याने शेतकरी मोठ्या संकटात आहे.कोरोनामुळे सातत्याने लहान घटक संकटात असताना आणि त्यांना कोणतीही मदत स्वतंत्रपणे दिली जात नसताना या आकस्मिक संकटांनी शेतकरी, कष्टकरी, हातावर पोट असणारे घटक खचून जाणार नाहीत, याची काळजी राज्य सरकारने घेतली पाहिजे."
 
अतिवृष्टीमुळे सीईटी परीक्षा देऊ शकले नाहीत अशा विद्यार्थ्यांना पुन्हा संधी
राज्यात काही जिल्ह्यात गेली दोन दिवस अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणत पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. या अतिवृष्टीमुळे महत्वाची सीईटी प्रवेश परीक्षा जे विद्यार्थी देऊ शकले नाहीत अशा विद्यार्थ्यांना परिक्षेसाठी पुन्हा संधी देण्यात येईल, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली.
 
सतत दोन दिवसांपासून राज्यात अनेक जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. यामुळे निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीमुळे आणि अनेक विद्यार्थी सीईटी प्रवेश परीक्षेसाठी केंद्रावर पोहोचू शकले नाहीत. यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, म्हणून या विद्यार्थ्यांना सीईटी परीक्षा देण्याची पुन्हा संधी देण्यात येणार आहे. याबाबत नव्याने तारखा जाहीर करण्यात येथील.
 
विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ दिले जाणार नाही. विद्यार्थ्यांनी काळजी करू नये, असे आवाहनही सामंत यांनी केले.
 
शाहीन चक्रीवादळाचा धोका
गुलाब चक्रीवादळामुळे कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झालंय. त्याचमुळे राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार स्वरुपाचा पाऊस पडतोय.
 
'गुलाब'चा परिणाम अजूनही ओसरला नसताना, आता दुसऱ्या एका वादळाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.
 
हे वादळ अरबी समुद्रामध्ये निर्माण होण्याची शक्यता असून त्याचं नाव 'शाहीन' असेल. हे नाव कतारनं दिलं आहे.
'गुलाब' चक्रीवादळ रविवारी ( आंध्र प्रदेश आणि ओडिशाच्या किनारपट्टीवर धडकलं. सोमवारी (27 सप्टेंबर) या वादळाचं रुपांतर कमी दाबाच्या क्षेत्रात झालं. सध्या हे क्षेत्र छत्तीसगढ आणि ओडिशाच्या दक्षिणेला आहे. गुरुवारी (30 सप्टेंबर) हा कमी दाबाचा पट्टा अरबी समुद्रात प्रवेश करून नवीन चक्रीवादळ तयार होऊ शकतं, असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.
 
या वादळाच्या प्रभावामुळे महाराष्ट्रातील किनारपट्टी भागाबरोबरच गुजरातमधील सौराष्ट्र आणि कच्छ या प्रांतांमध्ये काही दिवस मध्यम ते मुसळधार स्वरुपाचा पाऊस होण्याचा अंदाज हवामान खात्याकडून व्यक्त केला जातोय.