शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 29 सप्टेंबर 2021 (16:48 IST)

विद्यार्थ्यांची एमएचसीईटी आणि इतर अभ्यासक्रमांच्या सीईटी परीक्षा पुन्हा घेण्यात येणार

राज्यात मुसळधार पावसामुळे निर्माण झालेली स्थिती पाहता जे विद्यार्थी परीक्षा देऊ शकले नाहीत, अशा विद्यार्थ्यांच्या एमएचसीईटी आणि इतर अभ्यासक्रमांच्या सीईटी परीक्षा पुन्हा घेण्यात येणार आहेत. परीक्षेपासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नसून संबंधित विद्यार्थ्यांनी काळजी करू नये, असे राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितले. राज्यात दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात नद्यांना पूर आला आहे. मराठवाड्यात अनेक ठिकाणी नद्यांना पूर आला आहे. अनेक जिल्ह्यांत गावांचा संपर्क तुटला आहे. त्यामुळेच काही विद्यार्थ्यांना सीईटीची परीक्षा देता आल्या नाहीत. हे विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहिले आहेत. त्यामुळे परीक्षा घेण्यात येणार आहेत, असे मंत्री उदय सामंत म्हणाले.
 
ज्या विद्यार्थ्यांची सीईटीच्या लिंकवर नोंदणी झाली आहे. त्या सर्वांच्या परीक्षा पुन्हा घेण्यात येतील. त्यामुळे विद्यार्थ्यांनी घाबरुन जाऊ नये. पावसामुळे ज्यांच्या परीक्षा होऊ शकल्या नाहीत त्यांची तारीख आज किंवा उद्या जाहीर करणार आहोत, अशी माहिती मंत्री उदय सामंत यांनी दिली. 
 
दरम्यान, नवीन महाविद्यालय तसेच अभ्यासक्रम सुरु करण्यासाठी निश्चित केलेले वेळापत्रक कोविडमुळे एक महिना पुढे ढकलण्याचा निर्णय काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते.