शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 11 जून 2021 (21:27 IST)

मी तुमच्या सोबत : डॉ नितीन राऊत यांनी दिलीऔरंगाबाद जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांना ग्वाही

औरंगाबाद जिल्ह्यात कॉंग्रेसचा आमदार किंवा खासदार नसला तरी तुम्ही निराश होऊ नका, तुम्ही एकटे नाहीत तर मी तुमच्या सोबत आहे, अशी ग्वाही ऊर्जामंत्री व काँग्रेसचे अखिल भारतीय अनुसूचित जाती विभागाचे अध्यक्ष डॉ नितीन राऊत यांनी मराठवाड्यातील औरंगाबाद जिल्ह्यातील दौऱ्यावर असताना काँग्रेसच्या स्थानिक कार्यकर्त्यांना संबोधित करताना दिली.
 
काँग्रेस पक्षाचे आणि काँग्रेस विचारांचे बळकटीकरण केले पाहिजे असे म्हणत डॉ राऊत यांनी औरंगाबाद येथील स्थानिक काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये संजीवनी निर्माण केली. दोन दिवसीय मराठवाडा दौऱ्यानिमित्त औरंगाबाद येथे आले असता त्यांनी औरंगाबाद शहरातील गांधी भवन या काँग्रेस मुख्यालयास भेट दिली. याप्रसंगी जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष व माजी आमदार कल्याण काळे, माजी आमदार नारायण पवार, जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष मीनाताई शेळके, शहर अध्यक्ष हिशाम उस्मानी, महाराष्ट्र प्रदेश अनुसूचित जाती काँग्रेसचे कार्याध्यक्ष डॉ. जितेंद्र देहाडे, महिला काँग्रेस शहर जिल्हा अध्यक्ष सीमाताई थोरात उपस्थित होते. या सर्वांनी डॉ. राऊत यांचा सत्कार केला.
काँग्रेसची विचारधारा ही राज्यघटनेची विचारधारा आहे. काँग्रेस केवळ एक पक्ष नसून एक विचार आहे. समता, बंधुता आणि  स्वातंत्र्याचे विचार हे काँग्रेसच्या राजकीय विचारधारेचा भाग आहेत,असे यावेळेस बोलताना ते म्हणाले.
"काँग्रेसमध्ये ज्यांचे कोणी नाही त्यांच्यासोबत मी आहे. त्यांच्यासोबत काँग्रेसचे आदरणीय नेते राहुलजी गांधी आहेत आणि  काँग्रेस अध्यक्षा सोनियाजी गांधी आहेत. औरंगाबाद महानगरपालिका निवडणूकीत जी काही मदत लागेल ती काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष वा शहर अध्यक्ष यांनी सांगावी, मी मदत नक्की करेल," असा शब्द त्यांनी या प्रसंगी काँग्रेसजनांना टाळ्यांच्या कडकडाटात दिला.
 
औरंगाबादशी भावनिक जवळीक
 महामानव  डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाचे निर्माण केल्यानंतर औरंगाबाद शहराला शिक्षण क्षेत्रातील क्रांतीसाठी निवडले. म्हणून औरंगाबाद शहर मला अधिक प्रिय आहे.
 विदर्भ आणि मराठवाडयात अनेक साम्य आहेत असे डॉ राऊत म्हणाले. औरंगाबाद शहराचे संपर्क मंत्री हे अमित देशमुख असून ते खूप चांगल्या प्रकारे काम करत असल्याचे गौरवोद्गार डॉ राऊत यांनी काढले.