1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified बुधवार, 4 जानेवारी 2023 (15:21 IST)

मी छत्रपती संभाजी महाराजांबद्दल वादग्रस्त विधान केलेलं नाही, भूमिकेवर ठाम - अजित पवार

ajit pawar
छत्रपती संभाजी महाराजांबाबत केलेल्या वक्तव्याच्या मुद्द्यावर अजित पावर यांनी आज (बुधवार) मुंबईत पत्रकार परिषद घेऊन त्यांची भूमिका स्पष्ट केली.
 
त्यावेळी, मी वादग्रस्त विधान केलेलं नाही, मी आजही माझ्या विधानाशी ठाम आहे, असं स्पष्टीकरण देत शरद पवार यांनी जाहीर केलेली भूमिका मला मान्य असल्याचं म्हटलंय.
 
“मी छत्रपती संभाजी महाराजांबद्दल वादग्रस्त विधान केलेलं नाही, मी माझी भूमिका मांडली, ज्यांना योग्य वाटेल त्यांनी स्वीकारावी. महापुरुषांबद्दल कधीच बेताल वक्तव्यं केली नाहीत. मी काही इतिहास तज्ज्ञ नाही. किंवा साहित्यिक नाही”, असं विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले.
 
विधिमंडळ अधिवेशनातील भाषणादरम्यान छत्रपती संभाजी महाराजांबद्दल अजित पवारांनी काढलेल्या उद्गारांवरून राज्यातलं वातावरण पेटलं आहे.
 
"स्वराज्याचं रक्षण छत्रपती संभाजी महाराजांनी केलं. सूडबुद्धीने राजकारण केलं जातंय. मी इतिहासाचा संशोधक नाही. द्वेषाचं राजकारण करणं मला मान्य नाही. संभाजीराजेंच्या स्मारकासाठी मीच पाठपुरावा केला," असंही त्यांनी सांगितलं.
 
“महापुरुषांचा, राष्ट्रपुरुषांचा अपमान, बेताल वक्तव्य राज्यपालांनी केला आहे. मंत्रीमहोदय चंद्रकांत पाटील यांनीही यास्वरुपाचं वक्तव्य केलेलं आहे. प्रसाद लाड यांनीही जावईशोध लावला. गोपीचंद पडळकरांनीही अशाच स्वरुपाचं वक्तव्य केलं. अशा पद्धतीचं वक्तव्य मंत्री, नेते, राज्यपाल करत आहेत. त्याबद्दल बोलायला तयार नाहीत. त्यांनी माफी मागायला हवी, त्याचा काही मुद्दा काढत नाहीत. याची नोंद राज्याने घ्यायला हवी”, असं अजित पवार म्हणाले.
 
ते पुढे म्हणाले, “मी स्त्रियांबद्दल चुकीचं बोललेलो नाही. राज्यपालांनी महापुरुषांचा अपमान केला होता. बेताल वक्तव्य केलं होतं. हे सगळं मी निदर्शनास आणलं.
 
"भाजप कार्यकर्त्यांना आदेश देण्यात आले की अजित पवारांविरोधात आंदोलन करा. अजित पवारांचा राजीनामा मागा. मला भाजपने विरोधी पक्षनेता पद दिलेलं नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 53 आमदारांनी विरोधीपक्ष नेतेपद दिलं. मला या पदावर ठेवायचं की नाही हा अधिकार त्यांचा आहे. बाकीच्यांना तशी मागणी करण्याचा काडीचाही अधिकार नाही.
 
मला त्यांना प्रश्न विचारायचा आहे. त्यांच्या अनेक सहकाऱ्यांनी सांगितलं की तुमच्याविरोधात आंदोलन करायचं असं सांगण्यात आलं आहे. तुम्ही काय चुकीचं बोललात हे आम्हाला कळलेलं नाही. आंदोलनाचं स्वरुप ठरलं आहे, त्याचा फोटो काढायचा, ऑफिसला पाठवून द्यायचा असं सांगण्यात आलं.”
 
“अंतिम आठवडा प्रस्तावावर मी भाषण केलं. गेले दोन दिवस यासंदर्भात महाराष्ट्रात आंदोलनं घडत आहेत. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात आम्ही काम करत होतो. अर्थसंकल्पाच्या पहिल्याच पानावर महाराष्ट्राची अस्मिता स्फूर्तीस्थान स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांचा स्मृतिदिन या दिनाचे औचित्य साधून त्यांच्या कार्यकर्तृत्वाला साजेसे स्मारक वडूज येथे उभारण्याचे शासनाने ठरवलं आहे.
 
त्यासाठी महाविकास आघाडी सरकारने 250 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद केली. असामान्य शौर्य धाडस दाखवणाऱ्या नागरिकांना महाराजांच्या नावाने छत्रपती संभाजी महाराज शौर्य पुरस्कार योजना सुरु करण्यात येत आहे. मी अर्थसंकल्पात या गोष्टी मांडल्या. यासंदर्भात जून महिन्यात एक बैठक घेण्यात आली. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील या बैठकीत या सगळ्याला मंजुरी देण्यात आली”, असं त्यांनी सांगितलं.
Published By -Smita Joshi