शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 5 जुलै 2022 (23:08 IST)

'एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करण्याचा प्रस्ताव मीच दिला होता' - फडणवीस

devendra fadnavis eaknath shinde
"एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्याचा प्रस्ताव सुद्धा मीच दिला होता. मी सरकारमध्ये नसेन, असेही ठरले होते. मात्र, केंद्रीय नेतृत्वाने आग्रह धरल्याने मी सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला", असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
 
नागपूर प्रेस क्लबतर्फे आयोजित 'मीट द प्रेस' कार्यक्रमात ते बोलत होते. उपमुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर फडणवीस नागपूरला पोहोचले. तिथे त्यांचं जोरदार स्वागत झालं.
 
ते पुढे म्हणाले, "पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी अतिशय सुयोग्य निर्णय घेतला. ज्या पक्षाने मला सर्वोच्च पदावर बसविले, त्या पक्षाचा आदेश माझ्यासाठी शीर्षस्थानी आहे."
 
"मी मुख्यमंत्री झालो नाही, याचे 'सामना'ला दु:ख होण्याचे कारण नाहीच. त्यामुळे त्यांनी उपहासात्मकच लिहिले आहे. उपहासाला उत्तर द्यायचे नसते," असा टोला त्यांनी हाणला.
 
"शिवसेनेत एक उठाव झाला. ते बंड नाही. त्यातून ते आमच्यासोबत आले आणि आम्ही त्यांना मदत केली. आम्ही म्हटले असते, तर मुख्यमंत्रीपद आम्हाला मिळाले असते. पण, पदाची लालसा आम्हाला नव्हती. उलट शिवसेनेचाच मुख्यमंत्री करु, हा निर्णय आम्ही आधीच घेतला होता", असं ते म्हणाले.
 
"आमची चिंता करू नका. आम्ही एकमेकांना देणारे आहोत, एकमेकांकडून घेणारे नाही. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर ठामपणे उभी राहणारी शिवसेना ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आहे. पारिवारिक वारसा हा उद्धव ठाकरे यांच्याकडे असला तरी वैचारिक वारसा सुद्धा महत्त्वाचा असतो. हा वैचारिक वारसा घेऊन एकनाथ शिंदे पुढे जात आहेत", असं त्यांनी सांगितलं.
 
आणि मुख्यमंत्र्यांचं बोलणं ऐकून देवेंद्र यांनी डोक्याला हात लावला...
काल विधानभवनात एकनाथ शिंदेंनी गुपित उघड केले आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डोक्यालाच हात लावला.
 
"मी आणि फडणवीस कधी भेटायचो हे आमच्याही लोकांना माहिती नव्हते. सगळे झोपल्यावर मी फडणवीसांना भेटायला जायचो आणि सगळे उठायच्या अगोदर परत यायचो," एकनाथ शिंदे असं म्हणताच देवेंद्र फडणवीसांनी डोक्याला हात लावला आणि सगळं उघड करू नका अशी म्हणायची वेळ फडणवीसांवर आली.
 
"फडणवीसांनी एकच शपथविधी होईल असं सांगितलं होतं आणि सगळं माहिती असल्याने ते खूश होते. पण आम्ही बाळासाहेबांच्या हिंदुत्वाचा विचार घेतला आहे. त्यांचा आणि आमचा अजेंडा सारखाच आहे. त्यांचे 115 आणि आमचे 50 असे मिळून 165 झाले. अजितदादा तुम्ही मगाशी म्हणालात की आम्ही निवडून येणार नाही. पण जे पूर्वी गेले ते विरोधी पक्षात गेले, हिंदुत्वाचा विरोध केला त्यांच्याकडे गेले. आम्ही हिंदुत्वाचा पुरस्कार कऱणाऱ्यांकडे गेलो आहे. त्यामुळे 165 नाही, आम्ही दोघं मिळून 200 लोक निवडून आणणार," असा विश्वास एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.