शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 18 जून 2021 (09:35 IST)

काँग्रेस स्वतंत्र लढल्यास राष्ट्रवादी-शिवसेना एकत्र लढेल

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले सातत्याने स्वबळाची भाषा करत आहेत. स्थानिक स्वराज्य संस्था आणि आगामी विधानसभा निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढेल असं पटोले सातत्याने सांगत आहेत. त्यावर शिवसेनेनं मुखपत्र असलेल्या ‘सामना’मध्ये सगळेच स्वबळावर लढत असतील तर या शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला महाराष्ट्र हिताचा विचार करुन एकत्र लढावं लागेल, असं म्हटलंय. त्याबाबत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना विचारलं असता त्यांनीही राऊतांच्या सुरात सूर मिसळल्याचं दिसत आहे.
 
महाविकास आघाडीत ३ पक्ष आहेत. या ३ पक्षांनी एकत्र राहावं याला सगळ्यांनी प्राधान्य दिलं पाहिजे. काँग्रेसला जर स्वबळावर लढण्याची इच्छा असेल तर उरलेले दोन पक्ष नक्कीच एकत्र राहतील. त्या दृष्टीने सामनाने मत व्यक्त केल्याचं दिसत आहे आणि महाराष्ट्रातील जनतेचीही तशीच इच्छा दिसत आहे, असं जयंत पाटील म्हणाले. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत राज्यात तिरंगी लढत होण्याची शक्यता आतापासूनच व्यक्त केली जात आहे. कारण, भाजपचे नेते रावसाहेब दानवे यांनी भाजप स्वबळावर लढणार असल्याचं जाहीर केलंय. तर नाना पटोलेही सातत्याने स्वबळाची भाषा करताना दिसून येत आहेत.
 
संजय राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना राष्ट्रवादीसोबत युती करण्याचा पुनरुच्चार केला आहे. हल्ली राजकीय पक्षांना स्वबळाचं अजीर्ण नक्कीच झालं आहे. भाजप म्हणते आम्ही स्वबळावर लढू. भाजप एकटाच आहे. त्यामुळे स्वागत आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही स्वबळावर लढण्याची घोषणा केली आहे. सरकारमध्ये राहणार पण स्वबळावर लढणार, असं त्यांनी सांगितलं आहे. त्यांचंही स्वागत आहे. मग राहिले कोण? तर शिवसेना आणि राष्ट्रवादी. हे दोन्ही पक्ष राज्यातील प्रमुख आणि मोठे पक्ष आहेत. आम्ही दोघांनीही स्वबळाची भाषा केली नाही. त्यामुळे भविष्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र आले आणि निवडणूक लढले तर राज्यात चमत्कार होईल, असं राऊत म्हणाले.