गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 16 मार्च 2022 (08:42 IST)

फडणवीस यांना खरेच हे प्रकार उघडकीस आणायचे असतील तर त्यांनी हे प्रकरण जनतेसमोर आणावं !

‘महाविकास आघाडी सरकारच्या भ्रष्टाचार आणि गैरकारभाराचे पुरावे असलेले पेनड्राइव्ह विधानसभा अध्यक्षांना देऊन विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस एकप्रकारे नुरा कुस्ती खेळत आहेत,’ असा टोला वंचित बहुजन आघाडीचे नेते अड. प्रकाश आंबेडकर यांनी लगावला आहे.
 
आंबेडकरनगरला आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ‘फडणवीसांना खऱ्या अर्थानं भ्रष्टाचार जनतेसमोर आणायचा होता तर त्यांनी तो पेनड्राइव्ह विधानसभा अध्यक्षांना सादर न करता ही प्रकरणं जनतेसमोर उघड करायला हवी होती,’ असंही आंबेडकर म्हणाले.
 
विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी सध्या सुरू असलेल्या अधिवेशनात विधानसभा अध्यक्षांकडे दोन पेनड्राइव्ह सादर केले आहेत. त्यात आघाडी सरकारच्या भ्रष्टाचार आणि गैरकारभारांचे पुरावे असल्याचा दावा करण्यात येत आहे.
 
हे पुरावे संकलित करण्यासाठी करण्यात आलेल्या स्टींग ऑपरेशनवरून राज्यात चर्चाही सुरू आहे. तर पूर्वी पोलिसांच्या बदल्यांसंबंधीची गोपनीय माहिती उघड केल्यानं फडणवीस यांच्यासमोर कायदेशीर अडचणीही उभ्या राहिल्या आहेत.

या पार्श्वभूमीवर फडणवीस यांनी यावेळी आपल्याकडील माहितीचे पेनड्राइव्ह अधिवेशात अध्यक्षांकडं सादर करण्याचा पर्याय निवडला. मात्र, त्यांच्या या कृतीवरच आंबेडकर यांनी शंका घेतली आहे.
त्यांनी म्हटलं आहे, ‘अशा पद्धतीनं भ्रष्टाचाराचे पुरावे सरकारकडेच सादर करणं म्हणजे नुरा कुस्ती आहे.

फडणवीस यांना खरेच हे प्रकार उघडकीस आणायचे असतील तर त्यांनी हे प्रकरण जनतेसमोर आणावं. त्यातून ते नुरा कुस्ती खेळत आहेत की, खरे पैलवान आहेत, हे स्पष्ट होईल.’ असं आंबेडकर म्हणाले.