रविवार, 26 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 16 मार्च 2022 (08:32 IST)

रक्त पिशव्यासंबंधी महापालिकेचा मोठा निर्णय !

रुग्णांना रक्त मिळविण्यासाठी नातेवाईकांची होणारी धावपळ आणि आर्थिक लूट कमी होण्यास आता मदत होणार आहे.अहमदनगर महापालिकेने केवळ शहरातीलच नव्हे तर जिल्ह्यातील रूग्णांसाठी रक्त पिशवी मोफत उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे.महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पासंबंधीच्या बैठकीत सभापती कुमारसिंह वाकळे यांनी ही घोषणा केली.
 
वाकळे यांनी सांगितले की, ‘अहमदनगर महापालिकेने जिल्हाभरातील रुग्णांना मोफत रक्त पिशवी देण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी रुग्णाच्या नातेवाईकांना रक्त पिशवीच्या मोबदल्यात रक्तदान करण्याची अट ठेवण्यात आली आहे.
 
मात्र, जर रुग्णांकडे रक्तदाता नसेल तर त्याला शंभर रुपये शुल्क भरावे लागणार आहे. रक्त पिशवी मिळवण्यासाठी रुग्णांच्या नातेवाइकांची मोठ्या प्रमाणात धावपळ होत असते.
यासोबतच आर्थिक परिस्थिती बिकट असलेल्यांना मोठी कसरत करावी लागते. त्यामुळे रुग्णांच्या नातेवाइकांना दिलासा देण्यासाठी महापालिकेने हा निर्णय घेतला आहे,’ असे वाकळे यांनी सांगितले.

दरम्यान, स्थायी समितीच्या सभेची सुरवात राष्ट्रगीताने करण्याची प्रथा वाकळे यांनी सुरू केली. आपल्या देशाबद्दल प्रत्येकाच्या मनामध्ये प्रेमाची भावना निर्माण व्हावी, हा हेतू आहे.
राष्ट्रगीतामुळे प्रत्येकाला आपल्या देशाबद्दल अभिमान वाटतो. यापुढील काळात स्थायी समितीची सभा सुरू होण्यापूर्वी राष्ट्रगीताने सुरुवात होईल, अशी सूचना त्यांनी प्रशासनाला केली.