रस्त्यांवर आता खड्डे दिसले तर पोलिस नोंदवतील एफआयआर
रस्त्यांवर होणाऱ्या अपघातांना खड्डे कारणीभूत असतील, तर रस्तेबांधणी करणारी कंपनी, कंत्राटदार, एजन्सी यांच्यावर एफआयआर दाखल करण्यात येईल. स्वतः पोलीस आयुक्तांनी ही माहिती दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्रात रस्ते अपघातात मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे, तसेच यावर्षी ऑगस्ट महिन्यापर्यंत 228 जणांचा रस्ता अपघातात मृत्यू झाला आहे. ही मृत्यूंची संख्या कमी करण्यासाठी राज्याच्या नागपूर पोलिसांनी आता ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. रस्त्यांवरील खड्डे अपघातास कारणीभूत ठरल्यास संबंधित रस्ता बांधकाम कंपनी, संबंधित एजन्सी आणि कंत्राटदार यांच्याविरुद्ध एफआयआर नोंदवून त्यांच्याविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात येईल, असे आदेश नागपूर पोलीस आयुक्तांनी दिले आहेत.
गेल्यावर्षी जिल्ह्यात रस्ते अपघातात 138 जणांचा मृत्यू झाला होता, पण यावर्षी ऑगस्टपर्यंत 228 जणांचा रस्ता अपघातात मृत्यू झाला आहे. नागपूर पोलिसांनी रस्त्यावरील वाढत्या अपघातांचे प्रमाण बघता, रस्त्यावर एखाद्या व्यक्तीचा अपघात झाल्यास आणि त्याला रस्तेबांधणीचे काम जबाबदार असेल, तर बांधकाम कंपन्यांचे मालक, कंत्राटदार आणि सरकारी कर्मचाऱ्यांना जबाबदार धरले जाईल.
रस्त्यावरील बांधकाम सुरू असताना खड्डे पडून वाहनचालकाचा मृत्यू किंवा अपघात झाल्यास संबंधित कंपनीचे मालक व संबंधित एजन्सी यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात येईल, असे पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल यांनी आपल्या आदेशात म्हटले आहे. तसेच बांधकामाच्या ठिकाणी कंपनीचे नाव आणि जबाबदार अधिकाऱ्याचा मोबाईल क्रमांक नोंदवावा लागेल, असे आदेशही पोलिसांनी दिले आहेत.