1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 1 जुलै 2021 (23:14 IST)

कोरोनाची तिसरी लाट आली तर ती तिशीच्या आतील तरुणांसाठी धोकादायक : अजित पवार

कोरोनाची तिसरी लाट आली तर ती तिशीच्या आतील तरुणांसाठी धोकादायक असेल, असं टास्क फोर्सने स्पष्ट केलं आहे. त्यामुळे सावध राहा, असं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं आहे. अजित पवार आज नाशिकमध्ये होते. यावेळी त्यांनी जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला. त्यानंतर कोरोनाच्या तिसऱ्या लाटेबाबत हा इशारा दिला. 
 
सरकारने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उपाययोजना करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आहे. असं संकट यापूर्वी कधीच आलं नव्हतं, असं सांगतानाच आता तिसरी लाट येण्याची शक्यता आहे. ही लाट आली तर 30 वयोगटातील आतील लोकांना अधिक धोका असेल असं टास्क फोर्सने स्पष्ट केलं आहे. त्यामुळे तिसऱ्या लाटेत ऑक्सिजनची कमतरता भासू नये म्हणून जिल्ह्यातच ऑक्सिजन प्लांट उभारण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे, असं पवार यांनी सांगितलं.
 
कोरोनाच्या पहिल्या लाटेत 60 वर्षांवरील लोक बाधित झाले होते. दुसऱ्या लाटेत 30 ते 60 वयोगटातील लोकांना कोरोनाची बाधा झाली होती, असं ते म्हणाले. येत्या दोन महिन्यात 70 टक्के लसीकरण करण्याचं ठाकरे सरकारचं टार्गेट आहे. मात्र, एवढ्या लस नाहीत. तरीही आम्ही हे टार्गेट पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणार आहोत, असं त्यांनी सांगितलं. कोरोना कामात निधीची कमतरता भासू नयेत असा आमचा प्रयत्न आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.