1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 6 एप्रिल 2022 (07:09 IST)

रोणापालपर्यंत पाणी न आल्यास बेमुदत उपोषण करणार

farmer
बांदा: शेतीला पाणी मिळेल या आशेने शेतकऱ्यांनी पाटबंधारे विभागाला कवडीमोल दराने जमिनी दिल्या. मात्र गेली कित्येक वर्षे शेतकरी कालव्याच्या पाण्याची वाट बघत आहे. संशय येतो कि कालव्याचे काम शेतकऱ्याना पाणी देण्यासाठी आहे कि ठेकेदाराचे पोट भरण्यासाठी आहे. वेळोवेळी संबंधित विभागाला जाग आणून सुद्धा आमच्या गावा पर्यत पाणी येणार असल्याचे आश्वासन आपल्याकडून देण्यात येते त्यामुळे येत्या आठ तारीख पर्यंत रोणापाल पर्यंत पाणी न आल्यास नऊ तारीखला सकाळपासून आपल्या कार्यालयासमोर शेतकऱ्यांसह बेमुदत उपोषण करणार असल्याचा इशारा रोणापाल सरपंच सुरेश गावडे यांनी दिला आहे. त्या प्रकारचे लेखी पत्र त्यांनी  कार्यकारी अभियंता पाटबंधारे विभागाला दिले आहे.

या निवेदनात सरपंच सुरेश गावडे यांनी म्हटले कि, 18 ऑक्टोबर 2021 रोजी झालेल्या बैठकीत आपण 15 मार्च 2022 पर्यंत पाणी  रोणापाल येथील 42व्या किलोमीटर पर्यत येईल असे लेखी आश्वासन दिले होते. दरम्यानच्या काळात कोणतेच काम पाणी येण्याच्या दृष्टीने दिसले नाही परिणामी आम्ही परत  7 मार्च 2022 रोजी तुमची भेट घेतली असता तुम्ही 31 मार्च पर्यंत रोणापाल पर्यंत पाणी येईल असे आश्वासन दिले मात्र आज पर्यंत पाणी येण्याची कोणतीच आशा दिसत नसल्याने दिनांक 8 एप्रिल पर्यंत पाणी न आल्यास मी सर्व शेतकऱ्यांना सोबत घेऊन आपल्या कार्यालयासमोर उपोषणास बसणार असल्याचे लेखी निवेदन सरपंच गावडे यांनी कार्यकारी अभियंता पाटबंधारे विभाग यांना दिले आहे.याबाबतची प्रत सावंतवाडी पोलीस स्टेशन व तहसीलदार सावंतवाडी यांना दिली आहे.