आयआयटी मुंबईतील विद्यार्थ्याच्या आत्महत्येनंतर प्राध्यापक सूर्यनारायण दुल्ला यांना पदावरून काढले
प्राध्यापक सूर्यनारायण दुल्ला यांच्यावर आत्महत्येसाठी प्रवृत्त करणे आणि जातीय भेदभावाच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर सोमवारी त्यांना प्रशासकीय कामकाज विभागाच्या अधिष्ठाता पदावरूनही हटवण्यात आले.
आयआयटी मुंबईचा विद्यार्थी साहिल वाकोडेच्या आत्महत्येनंतर चर्चेत आलेल्या प्राध्यापक सूर्यनारायण दुल्ला यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. आयआयटी मुंबईने या प्राध्यापकांना रजेवर पाठवले आहे. दुल्ला यांच्यावर आत्महत्येसाठी प्रवृत्त करणे आणि जातीय भेदभावाच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर, सोमवारी त्यांना प्रशासकीय कामकाज विभागाच्या डीन पदावरूनही हटवण्यात आले. परीक्षेदरम्यान साहिल 'चीटजीपीटी' (CheatGPT) नावाचे एआय टूल वापरताना पकडला गेला होता. त्यानंतर त्याने आपल्या वसतिगृहात आत्महत्या केली.
प्राध्यापक दुल्ला यांनीच साहिल वाकोडेला पकडले होते. विद्यार्थ्यांनी प्राध्यापकांवर साहिलचा छळ केल्याचा आरोपही केला आहे. यानंतर मुंबई गुन्हे शाखेने गुन्हा दाखल केला.
साहिलच्या आत्महत्येनंतर, आयआयटी मुंबईच्या विद्यार्थ्यांनी कॅम्पसमध्ये आंदोलन केले. आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांनी व्यवस्थापनासमोर १८ मागण्या मांडल्या, ज्यावर सुमारे तीन तासांच्या चर्चेनंतर संस्थेच्या संचालकांनी स्वाक्षरी केली.
प्राध्यापक दुल्ला हे गेल्या १० वर्षांपासून आयआयटी मुंबईच्या ऊर्जा विज्ञान आणि अभियांत्रिकी विभागात प्राध्यापक आहेत. प्राध्यापक दुल्ला हे ऊर्जा प्रणाली, स्मार्ट ग्रिड आणि नवीकरणीय ऊर्जा या विषयातील तज्ज्ञ आहेत. यापूर्वी आयआयटी मुंबईमध्ये विद्यार्थी व्यवहार विभागाचे अधिष्ठाता म्हणून कार्यरत असलेले दुल्ला हे एक प्रख्यात प्राध्यापक आहेत. त्यांनी नागार्जुन विद्यापीठातून इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये बी.टेक, आयआयटी मुंबईतून एनर्जी सिस्टीम्स इंजिनिअरिंगमध्ये एम.टेक आणि आयआयटी दिल्लीतून पॉवर सिस्टीम्समध्ये पीएचडी पदवी प्राप्त केली आहे.
Edited By - Priya Dixit

