शुक्रवार, 22 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 27 नोव्हेंबर 2023 (08:13 IST)

कुणबी प्रमाणपत्रांना तत्काळ स्थगिती द्या-छगन भुजबळ

chagan bhujbal
हिंगोली : महाराष्ट्रात मराठा आरक्षणावरून राजकीय पेच निर्माण झाला आहे.अजित पवार गटाचे मंत्री छगन भुजबळ यांनी मराठा समाजाला ओबीसींमधून आरक्षण देण्यास विरोध केला आहे पण मनोज जरांगे पाटील आपल्या मागणीवरून मागे हटण्यास तयार नाहीत. यानंतर आता छगन भुजबळ यांनी मराठा आरक्षणाविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी गठीत केलेली न्यायमूर्ती शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील समिती तत्काळ रद्द करा आणि मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यावर ताबडतोब स्थगिती द्या, अशी मागणी छगन भुजबळ यांनी केली आहे. ते हिंगोली येथे ओबीसी एल्गार मोर्चात बोलत होते.

छगन भुजबळ यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. यावेळी ते म्हणाले की, “गरीब मराठा समाजाला आरक्षण द्या. फक्त आमच्यावर बुलडोझर चालवू नका, एवढंच माझं सांगणे आहे. त्यामुळे आमच्या काही मागण्या आहेत. जे मराठा समाजाच्या सारथीला मिळाले, तेच ओबीसी आणि महाज्योती, या सगळ्यांना मिळाले पाहिजे. आपण जी न्यायमूर्ती शिंदे यांची समिती निर्माण केली आहे, ताबडतोब रद्द करावी. कारण सर्वोच्च न्यायालयाने आधीच सांगितले आहे की, मराठा समाज मागास नाही.त्यामुळे या शिंदे समितीला काहीही अधिकार नाही.”

छगन भुजबळ पुढे म्हणाले, “निरगुडे आयोग किंवा ओबीसी आयोगाला आदेश असतील की, मराठा समाजाचे मागासलेपण सिद्ध करा. पण तुम्ही मराठा समाजाचे मागासपण कसं सिद्ध कराल? त्यासाठी मराठा समाजाचं एकट्याचं सर्वेक्षण होणार नाही. तसं चालणार नाही. आधी सर्वांचे सर्वेक्षण करा मग मराठा समाज इतरांच्या पुढे आहे की मागे आहे? हे तपासा मगच आरक्षण द्या. एकाच समाजाचे कसं काय सर्वेक्षण होऊ शकते. कुठला समाज कुठल्या समाजाच्या पुढे आहे, कुठला समाज कुठल्या समाजाच्या मागे आहे? हे तपासण्यासाठी तौलनिक अभ्यास करा. सगळ्यांचे सर्वेक्षण झाले पाहिजे.मगच ठरवलं पाहिजे की, कोण मागास आहे आणि कोण पुढारलेले आहे.”

ओबीसी जनमोर्चा आयोजित ओबीसी एल्गार महामेळाव्यात छगन भुजबळ यांनी त्यांच्या 15 ते 20 सभा झाल्यानंतर आमची एक सभा होते, असे म्हटले. ते घरं पेटवत आहेत पण त्यांना सांगायचे आहे की, पेटवायला अक्कल लागत नाही तर पटवायला अक्कल लागते, असे छगन भुजबळ म्हणाले. गेल्या दोन महिन्यांपासून माझ्या कुटुंबाला आक्षेपार्ह मेसेज केले जात आहेत, असे छगन भुजबळ म्हणाले. अधिकाराची लढाई असते त्यावेळी आमंत्रणाची वाट बघत बसू नका, असे आवाहन भुजबळ यांनी इतर ओबीसी नेत्यांना केले. मनोज जरांगे म्हणतात की छगन भुजबळ म्हातारे झाले आहेत पण जेवढे माझे केस आहेत तितकी आंदोलन मी केली आहेत.आंदोलने मला नवी नाहीत, असे भुजबळ म्हणाले. विविध मागण्या करुन ओबीसींना आरक्षणातून बाहेर काढण्याचा डाव असल्याचा आरोप भुजबळ यांनी केला.

Edited By - Ratnadeep Ranshoor