गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 12 एप्रिल 2021 (16:25 IST)

कोरोना चाचणी तपासणी केंद्रामध्ये वाढ करा, तपासणीसाठी येणाऱ्या नागरिकांना सुविधा पुरावा

पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होत असून बाधित रुग्णाच्या संपर्कातील नागरिकालाही चाचणी करावी लागते. त्यामुळे चाचणी करणाऱ्या नागरिकांचे प्रमाण वाढले आहे. परिणामी, चाचणी केंद्रांवर नागरिकांची मोठी गर्दी होत आहे. गर्दीमुळे अनेक नागरिकांना वेटिंगवर तासन तास कडक उन्हात थांबावे लागते. बसायला जागा देखील नाही. एखाद्याला कोरोना नसला तरी गर्दीतून होण्याची भीती आहे. त्यामुळे कोरोना चाचणी तपासणी केंद्रामध्ये वाढ करावी. तिथे सावली, बसण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी ‘ई’ प्रभाग समितीचे अध्यक्ष विकास डोळस यांनी केली आहे.
 
याबाबत आयुक्त राजेश पाटील यांच्याशी विकास डोळस यांनी संवाद साधला. डोळस म्हणाले, पिंपरी-चिंचवड शहरात मागील दोन महिन्यांपासून कोरोनाच्या रुग्णसंख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. एका बाधित रुग्णाच्या संपर्कातील पाच ते सात जणांची तपासणी केली जात आहे. दिवसाला पाच हजारहून अधिक चाचण्या केल्या जातात.
 
भोसरीत अंकुशराव लांडगे नाट्यगृह आणि भोसरी गावठाण अशा दोनच ठिकाणी कोरोना चाचणी तपासणी केंद्र आहे. अंकुशराव लांडगे नाट्यगृह येथे चाचणीसाठी नागरिकांची मोठी गर्दी होत आहे. 300 ते 350 नागरिक चाचणीसाठी रांगेत थांबत आहेत.
 
गर्दी असल्याने नागरिकांना तासन तास कडक उन्हात थांबवे लागते. सावलीची कोणतेही व्यवस्था नाही आणि बसायलाही जागा नाही. नागरिकांची संख्या मोठी असल्याने तपासणी करण्यासाठी आलेल्या एखाद्याला कोरोना नसला तरी गर्दीतून होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यातून कोरोनाचा प्रसार होऊ शकतो. त्यासाठी महापालिकेने चाचणी केंद्रामध्ये वाढ करावी.
 
केंद्राच्या ठिकाणी सावलीची व्यवस्था करावी. नागरिकांना बसण्याची सुविधा निर्माण करावी, अशी मागणी अध्यक्ष डोळस यांनी आयुक्तांकडे केली. त्यावर आयुक्त राजेश पाटील यांनी केंद्राच्या ठिकाणी सावलीची, बसण्याची व्यवस्था केली जाईल. चाचणी केंद्रामध्येही वाढ करण्याची ग्वाही डोळस यांना दिली.