शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 10 एप्रिल 2021 (22:43 IST)

उद्योगांसाठी Oxygen निर्मिती बंद; करोना रुग्णांना पुरवठा वाढवण्यासाठी सरकारचा निर्णय!

गेल्या काही दिवसांपासून राज्यात रेमडेसिवीर आणि ऑक्सिजनचा तुटवडा काही भागांमध्ये जाणवू लागल्याची तक्रार केली जात आहे. करोनाच्या रुग्णांची संख्या वाढल्यामुळे मोठ्या प्रमाणावर ऑक्सिजनची मागणी वाढल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे काही भागांमध्ये ऑक्सिजनची मागणी वाढली असून अतिरिक्त पुरवठ्याची मागणी केली जात आहे. ही वाढती मागणी पुरवण्यासाठी राज्य सरकारकडून महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यातील ऑक्सिजनचं उत्पादन करणाऱ्या कंपन्यांनी १०० टक्के ऑक्सिजन उत्पादन हे वैद्यकीय गरजेसाठी करावं, असे आदेश या कंपन्यांना देणार असल्याची माहिती राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे यांनी दिली आहे. एका खासगी वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी हे सांगितलं. त्यामुळे राज्यात करोना रुग्णांसाठी अतिरिक्त ऑक्सिजनचा साठा उपलब्ध होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
 
राज्यातील ऑक्सिजनची स्थिती आणि आगामी काळात वाढू शकणारी मागणी याविषयी राजेंद्र शिंगणे यांनी माहिती दिली. “गेल्या काही दिवसांमध्ये राज्यात काही ठिकाणी ऑक्सिजनचा तुटवडा जाणवतो आहे. राज्यात अनेक कंपन्या ऑक्सिजनचं उत्पादन करत असल्या, तरी ७ ते ८ कंपन्या मोठ्या प्रमाणावर ऑक्सिजन बनवतात. त्यांना टँकर्स, वाहतूक यासंदर्भात सरकारकडून लागेल ती मदत दिली जात आहे. राज्यात १२०८७ मेट्रिक टन ऑक्सिजनची निर्मिती होते. त्यापैकी ९२३ मेट्रिक टन ऑक्सिजन गेल्या आठवड्यात वापरला गेला होता. रुग्णांच्या संख्येसोबत ऑक्सिजनचा वापर वाढणार आहे. आज होणाऱ्या उत्पादनात फार वाढ होईल, असं वाटत नाही. त्यामुळे इतर राज्यांमधून त्याच्या पुरवठ्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. मध्य प्रदेशमधून पुरवठा सुरू झाला आहे. गुजरात आणि छत्तीसगड या राज्यांमधून देखील ऑक्सिजन मिळवण्याचा प्रयत्न सुरू आहे”, अशी माहिती राजेंद्र शिंगणे यांनी दिली आहे.