ही तर योजना व धोरणे चुकल्याची अप्रत्यक्ष कबुली : राजू शेट्टी
अर्थसंकल्पात अल्पभूधारक शेतकऱ्यांना सहा हजारांचे वार्षिक अनुदान देण्याची घोषणा करण्यात आली. मात्र, ही घोषणा म्हणजे सरकारच्या आजपर्यंतच्या कृषी क्षेत्राविषयक योजना व धोरणे चुकल्याची अप्रत्यक्ष कबुली असल्याची टीका खासदार राजू शेट्टी यांनी केली. अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी करण्यात आलेल्या तरतुदींविषयी काय वाटते, असे त्यांना विचारण्यात आले. त्यावेळी राजू शेट्टी यांनी सरकार गेली साडेचार वर्ष झोपा काढत होते, का असा सवाल उपस्थित केला. आता आपलं काही खरं नाही आणि सत्ता जाणार हे लक्षात आल्यानंतर सरकारकडून शेतकऱ्यांना आमिष दाखवले जात आहे.
२०१४ च्या निवडणुकीत नरेंद्र मोदी यांनी शेतीमालाला दीडपट हमीभाव देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, आताची परिस्थिती पाहिल्यास शेतीमालाला हमीभावापेक्षाही हजार रुपये कमी भाव मिळत आहे. त्यामुळे शेती तोट्याची झाली आहे. आजच्या अर्थसंकल्पातून सरकारने याची अप्रत्यक्ष कबुलीही दिल्याचे राजू शेट्टी यांनी म्हटले आहे.