SSC Result 2021 Date: दहावीच्या विद्यार्थ्यांची अंतर्गत मूल्यमापन आजपासून सुरू
दहावीच्या विद्यार्थ्यांची अंतर्गत मूल्यमापन करण्याची प्रक्रिया आज 10 जूनपासून सुरू होणार आहे. उद्या शिक्षक व मुख्याध्यापकांना मू्ल्यमापन कार्यपद्धतीचे यू ट्युबच्या माध्यमातून प्रशिक्ष दिले जाणार आहे. या वेळापत्रकानुसार दहावीच्या मूल्यमापनाचा कार्यक्रम 10 जून ते 3 जुलैपर्यंत चालणार असून त्यानंतर जुलैमध्ये निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे.
यासाठी ऑप्टिकल मार्क्स रीडिंग ही पद्धत वापरली जाणार असल्याचेही शिक्षण विभागाच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे. दहावीची परीक्षा रद्द केल्यानंतर दहावीचा निकाल अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी शाळा पातळीवर गुणांकन करण्याची जबाबदारी दिली आहे.
नुकतीच शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी घेतलेल्या मुख्याध्यापकांच्या बैठकीत बहुतांश मुख्याध्यापकांनी अंतर्गत मूल्यमापनाची प्रक्रिया पूर्ण होत आली असल्याचे सांगितले असून, शाळांकडून ऑप्टिकल मार्क्स रीडिंग शीट भरून पाठवल्या जाणार आहेत. या शीटद्वारे विद्यार्थ्यांचे अंतर्गत मूल्यांकनाचे गुण राज्य माध्यमिक मंडळाकडे जाणार असून, त्याद्वारे निकालाची प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे.