पाऊस पुन्हा एकदा बरसणार, विशेष काळजी घ्या, वेधशाळेकडून आवाहन
राज्यातील अनेक भागांना झोडपून काढणारा पाऊस पुन्हा एकदा बरसणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकण या भागात पावसाच्या मध्यम ते हलक्या आणि काही भागात जोरदार सरी कोसळणार असल्याचं हवामान खात्याकडून सांगण्यात आलं आहे.
पुढील चार ते पाच दिवसांसाठी पर्जन्यमानाचा हा अंदाज वर्तवण्यात आला असून, २१ आणि २२ ऑक्टोबरला विशेष काळजी घेण्याचा इशाराही देण्यात आला आहे. कुलाबा वेधशाळेचे उपमहासंचालक कृष्णानंद होसाळीकर यांनी ट्विट करतही यासंदर्भातील माहिती दिली.
'IMD GFS नुसार 21, 22 ऑक्टोबर दरम्यान राज्यात काही भागात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता. विदर्भ,मराठवाडा,द.मध्य महाराष्ट्र, द.कोकणाच्या काही भागात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता', असा इशारा देत त्यांनी बळीराजानं पिकाची काळजी घेणे आवश्यक असल्याचं सांगत सर्वांनाच सतर्क केलं. शिवाय येते काही दिवस हवामान खात्याच्या इशाऱ्यांवर लक्ष ठेवण्याचं आवाहनही केलं.