रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 8 फेब्रुवारी 2017 (15:29 IST)

शिवसेनेचे धनुष्य काढा आणि हातात नारळ असलेला माणूस निशाणी दया - आव्हाड

शिवसेनेची धनुष्य बाण ही निशाणी बदलून हातात नारळ असलेला माणूस ही निशाणी देण्याची मागणी निवडणूक आयोगाकडे राष्ट्रवादी काँग्रेस करणार असल्याचा टोला राष्ट्रवादीचे आ. जितेंद्र आव्हाड  यांनी लगावला आहे. शिवसेनेच्या एका उमेदवाराने पत्नीच्या डोक्यात प्रचाराचा नारळ मारला, या पार्श्वभूमीवर आज ठाणे येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. हा प्रकार अत्यंत लांछनास्पद असून शिवसेनेने त्या उमेदवाराची उमेदवारी त्वरीत रद्द करावी, असे खडेबोल आव्हाड यांनी सुनावले आहेत. स्वतःच्या बायकोचादेखील सन्मान न करणारे काय महिलांचा मान राखणार व महिलांचे संरक्षण करणार? असा प्रश्न आव्हाड यांनी उपस्थित केलाय.
 
ठाणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत आव्हाड यांनी सत्ताधारी शिवसेनेवर कडाडून टीका केली. ठाणेकरांचे साडेतीन हजार कोटी रुपये शिवसेनेने नळातून वाया घालवले. सत्ताधाऱ्यांनी पाण्याचे नियोजन न केल्यामुळे फेब्रुवारी महिन्यातच ठाणेकरांना पाण्याची टंचाई भासू लागली आहे. सेनेकडे दूरदृष्टीचे धोरण नसून २५ वर्षात यांनी ठाण्यासाठी काहीही केलेले नसल्याचे आव्हाड म्हणाले. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून झालेल्याच अनेक विकासकामांचे क्रेडिट शिवसेनेतर्फे घेतले जात आहे, असेही त्यांनी सांगितले. ठाणे मनपा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे २४ क प्रभागात जितेंद्र पाटील निवडणूक लढवणार असल्याची माहिती आव्हाड यांनी यावेळी दिली.