मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 5 डिसेंबर 2020 (10:18 IST)

चंद्रपूरमधील कन्हाळ गाव अभयारण्य म्हणून घोषित

राज्य वन्य जीव मंडळाच्या बैठकीत कोल्हापूर, सातारा, सिंधुदुर्ग आणि विदर्भातील २ ठिकाणांसह एकूण १० नवीन संवर्धन राखीव क्षेत्राला मान्यता देण्यात आली. तर चंद्रपूरमधील कन्हाळ गाव हे अभयारण्य घोषित म्हणून करण्यात आले.
 
आंबोली दोडामार्ग (सिंधुदुर्ग), चंदगड, आजरा- भुदरगड, गगनबावडा, पन्हाळगड (कोल्हापूर), जोर जांभळी व मायनी (सातारा) या पश्चिम घाटातील या ८ संवर्धन राखीव  क्षेत्रामुळे वन्यजीवांचा भ्रमण मार्ग संरक्षित झाला आहे. तर विदर्भातील महेंद्री व मुनिया या क्षेत्रास ही संवर्धन राखीवचा दर्जा देण्यात आला आहे.
 
राज्यात पूर्वी ६ आणि नवीन घोषित तिलारी अशी मिळून ७ संवर्धन राखीव आहेत. त्या क्षेत्रात महत्वाची कामे करण्यासाठी २० कोटी रुपयांचा निधी द्यावा, या वन विभागाच्या मागणीवर प्रस्ताव पाठवण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.
 
महेंद्रीला संवर्धन राखीव घोषित करताना भविष्यात त्याचे अभयारण्यात रूपांतर करण्यापूर्वी लोकांना विश्वासात घेऊन, गावकऱ्यांशी चर्चा करून पुनर्वसनाचा कालबद्ध कार्यक्रम तयार करावा व वाघाप्रमाणे बिबट्या आणि मानव संघर्ष कमी करण्यासाठी उपाययोजना सुचवाव्यात त्यासाठी तज्ज्ञांची समिती स्थापन करा, अशा सूचनाही त्यांनी केली.