शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 22 जानेवारी 2021 (22:09 IST)

किसान सभेकडून राज्यव्यापी वाहन मार्चचे आयोजन

केंद्र सरकारने केलेले कॉर्पोरेट धार्जिणे आणि शेतकरी विरोधी कृषी कायदे रद्द करा आणि शेतीमालाला आधारभावाचे कायदेशीर संरक्षण द्या अशा मागण्यांसाठी दिल्ली येथे आंदोलन झाले. ऐतिहासिक शेतकरी आंदोलनाला निर्णायकरित्या आणखी व्यापक करण्यासाठी महाराष्ट्रात अखिल भारतीय किसान सभेने राज्यव्यापी वाहन मार्च आयोजित केला आहे. नाशिक येथील गोल्फ क्लब मैदान येथून नेताजी सुभाष चंद्र बोस जयंती दिनी २३ जानेवारीला दुपारी शेकडो वाहने घेऊन सुमारे २० हजार शेतकरी या वाहन मार्चमध्ये सहभागी होत आहेत.
 
अखिल भारतीय किसान सभा, सीटू कामगार संघटना, अखिल भारतीय शेतमजूर युनियन, अखिल भारतीय जनवादी महिला संघटना, डीवायएफआय ही युवक संघटना व एसएफआय ही विद्यार्थी संघटना महाराष्ट्रातील शेतकरी, कामगार, शेतमजूर, महिला, युवक व विद्यार्थ्यांना घेऊन या मार्चमध्ये सामील होणार आहेत.
 
नाशिक येथून निघालेला हा वाहन मार्च दिनांक २३ जानेवारीला सायंकाळी घाटनदेवी येथे रात्री मुक्कामी थांबेल. २४ जानेवारीला सकाळी ९ वाजता घाटनदेवी येथून निघून २० हजार शेतकरी कसारा घाट उतरून मुंबईच्या दिशेने कूच करतील.
 
दिल्लीतील शेतकरी आंदोलन तीव्र करण्यासाठी संयुक्त किसान मोर्चाने देशभर २३ ते २६ जानेवारी या काळात सर्व राज्यांच्या राजधान्यांमध्ये राज्यपाल भवनांवर आंदोलन करण्याची हाक दिली आहे. मुंबई येथील आझाद मैदान येथे या आवाहनानुसार सुरू करण्यात येत असलेल्या महामुक्काम सत्याग्रहात सामील होण्यासाठी किसान सभेचा हा वाहन मार्च २४ जानेवारीला दुपारी सामील होईल.
 
राज्यभरातील १०० हून अधिक संघटनांच्यावतीने संयुक्त शेतकरी कामगार मोर्चाच्या झेंड्याखाली मुंबईतील हे महामुक्काम आंदोलन होणार आहे. अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समिती (महाराष्ट्र), कामगार संघटना संयुक्त कृती समिती (महाराष्ट्र), जन आंदोलनांची संघर्ष समिती (महाराष्ट्र), नेशन फॉर फार्मर्स (महाराष्ट्र) आणि हम भारत के लोग (महाराष्ट्र) या पाच मंचांनी मिळून संयुक्त शेतकरी कामगार मोर्चा तयार केला आहे.
 
२५ जानेवारीला आझाद मैदान येथे सकाळी ११ वाजता प्रचंड सभा होईल. महाराष्ट्रातील सत्ताधारी महाविकास आघाडीतील सर्व पक्ष, डावे व लोकशाही पक्ष यांच्या प्रमुख नेत्यांसोबत अखिल भारतीय किसान सभेचे सरचिटणीस आणि दिल्लीतील आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या संयुक्त किसान मोर्चाचे एक प्रमुख नेते माजी खासदार हनन मोल्ला या सभेस संबोधित करतील. सभेनंतर येथे जमलेले हजारो श्रमिक दुपारी २ वाजता राज भवनाकडे कूच करतील व प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राज्यपालांना आपल्या मागण्यांचे निवेदन सादर करतील.
 
शेतकरी विरोधी कृषी कायदे रद्द करा, शेतीमालाला आधार भावाचे संरक्षण देणारा कायदा करा, वीज विधेयक मागे घ्या, कामगार संहितेमधील कामगार विरोधी बदल रद्द करा, वनजमीन तथा देवस्थान, गायरान, आकारीपड, बेनामी व वरकस जमीन कसणारांच्या नावे करा आणि महात्मा फुले कर्जमुक्ती योजनेची अंमलबजावणी पुन्हा सुरू करून सर्व शेतकऱ्यांना योजनेचा लाभ द्या, या मागण्या आंदोलनात करण्यात येणार आहेत.
 
२६ जानेवारीला प्रजासत्ताक दिनी सकाळी मुंबईच्या आझाद मैदानावर राष्ट्रध्वज फडकवून, राष्ट्रगीत गाउन आणि शेतकरी-कामगारांचे हे आंदोलन विजयी करण्याचा निर्धार करून या महामुक्कामाची सांगता होईल.