कोल्हापूर :महापुरात सगळंच वाहून जातं, झाडे जाती, तिथं लव्हाळे वाचती - किशोरी पेडणेकर यांनी मुख्यमंत्र्यांना टोला लगावला
देवाच्या दारात योग्य न्याय होईल. जाणाऱ्यांना करवीर निवासिनीने सुबुद्धी द्यावी,असे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी टोला लगावला आहे. महापुरात कोणाला वाहून जायचं ते जाऊदेत. महापुरात झाडे जाती, तिथे लव्हाळे वाचती, असा खोचक विधानही पेडणेकर यांनी केले आहे. त्या आज कोल्हापुरात करवीर निवासिनी अंबाबाईच्या दर्शनासाठी आल्या होत्या. त्यावेळी त्या माध्यमाशी बोलत होत्या.
कोल्हापूरमध्ये पर्यटन करण्याची गरज नाही. कारण साडेतीन शक्तिपीठांपैकी एक जाज्वल पीठ करवीर नगरीत आहे. आम्ही नेहमी करवीर निवासिनी अंबाबाईच्या दर्शनासाठी येत असतो. दोनवर्षे कोरोनामुळे येणे झाले नाही. त्यानंतर मी दुसऱ्यांदा कोल्हापूरला आलो आहे. देवीची पूजा मी नेहमी करत असतो. दर्शन घेतल्यानंतर स्वतःच्या आईला भेटलं असं वाटत असते, असे पेडणेकर म्हणाल्या.
ज्यावेळी कोल्हापुरावर संकट आलं त्यावेळी देवीनं कोल्हासुर राक्षसाचा वध केला. ज्यावेळी अविचारांचे राज्य माजते त्यावेळी आई रूप घेते. ती आपल्या पद्धतीने रूप दाखवते. आपण सर्वजण तिचे मुले आहोत. मुले चुकीली आई रागावते, फटका देते. त्यामुळे देवीच्या चरणी अशा सर्वाना सुबुद्धी देण्याचं साकडं घालून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना ताकद देण्याची देवीपुढे मागणी केल्याचे पेडणेकर यांनी सांगितले.