गुरूवार, 14 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 21 ऑगस्ट 2021 (17:04 IST)

मुलगा होत नाही म्हणून मित्राच्या मुलाची निर्घृण हत्या

kolhapur man
कागल (कोल्हापूर) : मुलगा होत नाही म्हणून मित्राच्या सात वर्षीय मुलाचं अपहरण करुन त्याची निघृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना कोल्हापूरच्या कागल तालुक्यात घडली आहे. विशेष म्हणजे हा एक नरबळीचा प्रकार असल्याचा अंदाज वर्तवण्यात येतोय. या घटनेमुळे संपूर्ण कोल्हापूर जिल्हा हादरला आहे.
 
वरद रवींद्र पाटील असे बळी देण्यात आलेल्या सात वर्षाच्या बालकाचे नाव आहे. त्याचे सावर्डे बुद्रुक (ता. कागल) येथून दोन दिवसांपूर्वी अपहरण झाले होते. याबाबतची त्याचे वडील रवींद्र गणपती पाटील यांनी मुरगूड पोलिसात तक्रार दिली होती. त्यानुसार पोलिसांनी तपास करत संशयित आरोपी ताब्यात घेऊन चौकशी केली.
 
पोलिसांनी आरोपी मारुती वैद्य (वय 45) याची चौकशी केली असता त्याने मुलास गळा दाबून शेतामध्ये हत्या केल्याची कबुली दिली. मुलाचा मृतदेह सावर्डे गावच्या तलावापासून 200 मीटर अंतरावरील शेतामध्ये सापडला. यावेळी पंचक्रोशीतील नागरिक आणि महिलांनी प्रचंड संताप व्यक्त करत पोलिसांना घेराव घातला. आरोपीस बारा दिवसाच्या आत फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी त्यांनी केली.
 
ग्रामस्थांनी जोरदार घोषणाबाजी देखील केल्या. त्यामुळे पोलीस ठाण्याबाहेर काही काळ तणाव निर्माण झाला होता. दरम्यान ही हत्या नरबळीच्या प्रकारातून झाल्याची चर्चा काल दिवसभर सुरु होती. मात्र प्राथमिक तपासात तसं दिसत नसल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलं. या प्रकरणाची सर्व बाजूने कसून चौकशी करून हत्येचे कारण समोर आणलं जाईल, असं पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी सांगितलंय.