शाळेच्या दाखल्यात वानखेडे मुस्लिम असल्याचा मलिकांच्या दाव्यावर क्रांती रेडकर म्हणते…
महाराष्ट्राचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी गुरुवारी मुंबईतील क्रूझ ड्रग्ज प्रकरणावरुन निशाण्यावर असलेले एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडेंबाबत नवा खुलासा केला. मलिक यांनी समीर वानखेडे यांच्या धर्माबद्दल माहिती देण्यासाठी शाळा सोडल्याचा दाखला समोर आणला. मलिक यांनी हे प्रमाणपत्र देऊन वानखेडे मुस्लिम असल्याचा आरोप केला. मलिक यांनी सेंट जोसेफ हायस्कूल आणि सेंट पॉल हायस्कूलचे लिव्हिंग सर्टिफिकेट अशी दोन प्रमाणपत्रे सादर केली. ही दोन्ही प्रमाणपत्रे समीर वानखेडे यांची असून, त्यात त्यांचे पूर्ण नाव समीर दाऊद वानखेडे असे लिहिले आहे.
यावर आता समीर वानखेडेंची पत्नी आणि अभिनेत्री क्रांती रेडकरने प्रतिक्रिया दिली आहे. क्रांतीने नवाब मलिकांच्या दाव्यांना उत्तर देण्यासाठी काही कागदपत्रे ट्विटवर पोस्ट केली आहेत. तसेच समीर वानखेडेंची बदनामी करण्यासाठी अर्धी माहिती दिली असल्याचे क्रांती रेडकरने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
“समीर वानखेडे यांची बदनामी करण्यासाठी वाईट विचारांच्या लोकांनी अर्धी माहिती शेअर केली. एक चूक झाली होती. नंतर त्याची रीतसर दुरुस्ती ज्ञानदेव वानखेडेंनी १९८९ मध्ये सर्व कायदेशीर औपचारिकता आणि प्रक्रियांसह केली होती. शाळेच्या मुख्याध्यापकांनी सर्व कागदपत्रे स्वीकारली आणि पडताळली आहेत,” असे क्रांतीने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
समीर वानखेडे यांनी नवाब मलिक यांच्या आरोपांवर स्पष्टीकरण देणारे प्रमाणपत्र न्यायालयात सादर केले होते. ज्यामध्ये त्यांचे नाव समीर ज्ञानदेव वानखेडे असे लिहिले होते. त्याला प्रत्युत्तर म्हणून नवाब मलिक यांनी आता ही नवीन प्रमाणपत्रे दिली होती.