लातूर महानगरपालिकेच्या ढिसाळ कारभाराविरोधात राष्ट्रवादीचे ठिय्या आंदोलन
लातूर महापालिकेने तीन वर्षांत घंटागाडीचे, कचरा विल्हेवाट लावण्याचे टेंडर न काढल्याने शहर दुर्गंधीयुक्त बनले आहे. त्यामुळे रोगराई पसरत आहे. कचऱ्याची विल्हेवाट लावावी, तसेच रस्त्यांची दुरावस्था, पिण्याच्या पाण्याच्या प्रश्न, पथदिव्यांचा प्रश्न आणि महिलांसाठी सार्वजनिक शौचायलयाच्या प्रश्नाबाबत महापालिका उदासीन दिसून येत आहे. याचाच निषेध म्हणून सत्ताधाऱ्यांविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसने मनपा प्रवेशद्वारासमोर ठिय्या आंदोलन केले. हे प्रश्न सोडवण्यासाठी महानगरपालिकेच्या आयुक्तांना व महापौरांना निवेदन सादर करण्यात आले.
शहरातील नाल्यांची मनपाकडून साफसफाई केली जात नाही. कचऱ्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. शहरातील बहुतांश पथदिवे बंद आहेत, अतिक्रमणे वाढली असून, ती हटविण्यात यावीत. खड्ड्यांमुळे रस्त्यांची दैना उडाली असून अपघातांचे प्रमाण वाढले आहे. रस्ते दुरुस्ती तात्काळ करण्यात यावी, या मागण्यांसाठी आम्ही वारंवार पाठपुरावा करूनही दुर्लक्ष होत असल्यामुळे आंदोलनाचा पवित्रा घ्यावा लागला, अशी प्रतिक्रिया लातूर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहर जिल्हाध्यक्ष तथा मनपा विरोधीपक्षनेते मकरंद सावे यांनी दिली.
यावेळी लातूर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहर जिल्हा कार्याध्यक्ष प्रशांत पाटील, लातूर महिला जिल्हाध्यक्षा रेखा कदम, पप्पूभाई कुलकर्नी, नगरसेवक राहुल माकनीकर, नगरसेवक रेहना बासले, विद्यार्थी जिल्हाध्यक्ष विशाल विहीरे, विद्यार्थी मुख्यसंघटक स्वप्नील दिक्षीत, विनोद रणसुभे, नवनाथ आल्टे, जाकीर तांबोळी आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.