शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 28 डिसेंबर 2022 (08:45 IST)

महाराष्ट्र मिनी ऑलिम्पिक युवा खेळाडूंना सुवर्णसंधी

girish mahajan
महाराष्ट्र शासन व महाराष्ट्रऑलिम्पिक असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र मिनी ऑलिम्पिक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.  पुणे जिल्हयातील म्हाळुंगे बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा संकुल येथे  2 ते  12 जानेवारी, 2023 या कालावधीत या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

राज्याचे क्रीडा मंत्री गिरीष महाजन यांच्या मार्गदर्शनात या स्पर्धेचे आयोजन होत आहे. विभागीय आयुक्त सौरभ राव आणि  क्रीडा आयुक्त सुहास दिवसे स्पर्धेच्या आयोजनासंबधी लक्ष ठेवून आहेत. पुण्यामध्ये ही स्पर्धा होणे हे गौरवशाली असून यानिमित्ताने पुण्याचे क्रीडा वैभव आणि क्रीडा क्षेत्राची ओळख देशपातळीवर पोहोचविण्याची मोठी संधी आहे. त्याबाबतचा हा लेख
 
उपरोक्त कालावधीत पुणे जिल्हयातील म्हाळुंगे बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा संकुल येथे महाराष्ट्र मिनी ऑलिम्पिक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. यात एकूण 39 खेळ प्रकारांचा स्पर्धेत समावेश असून बालेवाडी येथे 21 खेळ प्रकारांचे आयोजन होत आहे. तसेच नागपूर-4, जळगाव-4, नाशिक-2, मुंबई, बारामती, अमरावती, औरंगाबाद, सांगली व  पुणे परिसरात एमआयटी, विमाननगर व पूना क्लब येथे प्रत्येकी 1 याप्रमाणे खेळ प्रकारांचे आयोजन होत आहे.
 
महाराष्ट्र राज्याला क्रीडा संस्कृतीचा मोठा वारसा आहे. क्रीडा धोरण राबविणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य आहे. तसेच क्रीडाविषयक पायाभूत सुविधा निर्माण व विकसित करण्यासाठी महाराष्ट्र राज्य देशात अग्रेसर आहे. आंतरराष्ट्रीय क्रीडा जगतातील घडामोडीचा वेध घेवून भविष्यात करावयाच्या कार्यप्रणालीसंबंधात राज्य शासनाने क्रीडा धोरण आखले असून, 2012 सालापासून त्याची अंमलबजावणी करण्यात येत आहे.
 
क्रीडा क्षेत्राचा विकास हा त्या देश-राज्याच्या प्रगतीचा एक टप्पा मानला जातो. त्यामुळे देश आणि राज्य पातळीवर खेळाडूंना सातत्याने प्रोत्साहन देण्याचे प्रत्येक शासनाचे धोरण असते, त्या धोरणाच्या माध्यमातून विविध योजना, उपक्रम शासन राबवित असते. महाराष्ट्र शासन देखील क्रीडा क्षेत्राच्या विकासासाठी विविध नाविन्यपूर्ण योजना, उपक्रम राबवित असून त्या माध्यमातून राज्यात क्रीडा क्षेत्राला प्रोत्साहन दिले जात आहे.
 
मिनी ऑलिम्पिक
राज्यातील शहरी आणि विशेषत: ग्रामीण भागातील क्रीडा क्षेत्रातून आगामी ऑलिम्पिक स्पर्धेसह विविध आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांसाठी दर्जेदार क्रीडापटू तयार व्हावेत, या हेतूने राज्यात मिनी ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र शासनाचे क्रीडा व युवक सेवा संचालनालय व महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. यात तिरंदाजी, अ‍ॅथलेटिक्स, बॅडमिंटन, बास्केटबॉल, बॉक्सिंग, तलवारबाजी, फुटबॉल, जीम्नॅस्टीक्स्, हँडबॉल, हॉकी, ज्युडो (मुले व मुली), कबड्डी, खो-खो, लॉन टेनिस, मॉडर्न पेंटॅथलॉन, शुटींग, रोविंग, रग्बी, स्वीमिंग-वॉटरपोलो, टेबल टेनिस, तायक्वाँडो, ट्रायथलॉन, व्हॉलीबॉल, वेटलिफ्टींग, रेस्टलींग, वु-शू, सायकलिंग (रोड व ट्रॅक), नेटबॉल, सेपक-टक्रॉ, स्क्वॅश, मल्लखांब, शुटींग बॉल, सॉफ्टबॉल, योगासने, सॉफ्ट टेनिस, रोलर स्केटींग, यॉटींग, गोल्फ आणि कॅनाईंग-कयाकिंग या क्रीडा प्रकारांचा या स्पर्धेत समावेश करण्यात आला आहे.
 
सुमारे 7 हजार खेळाडूंसह, संघाचे व्यवस्थापक, प्रशिक्षक, तांत्रिक अधिकारी व पंच असे मिळून 10 हजार 456 जण स्पर्धेमध्ये सहभागी होणार आहेत. महाराष्ट्र शासनाने या स्पर्धेसाठी 19 कोटी 7 लक्ष 94 हजार इतका निधी उपलब्ध करून दिला आहे. सदरहू स्पर्धा राज्यस्तरीय सर्वोच्च स्पर्धा असून ती राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांच्या धर्तीवर पार पडणार आहे. त्या-त्या खेळांतील राज्य अजिंक्यपद स्पर्धेतील प्रथम आठ स्थानावर आलेल्या संघातील खेळाडू या स्पर्धेत सहभागी होणार आहेत.
 
क्रीडा ज्योत
स्पर्धेच्या निमित्ताने क्रीडा ज्योत रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. रायगड किल्ला येथून क्रीडा ज्योत निघून पुणे येथे पोहोचेल. तसेच आठ विभागीय मुख्यालय येथून क्रीडा ज्योतींचे पुणे येथे आगमन होणार असून, पुणे येथे क्रीडा ज्योतींची भव्य रॅली काढण्यात येणार आहे.
 
क्रीडामंत्री गिरीष महाजन यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तर आयोजन समितीची स्थापना करण्यात आली आहे. समितीच्या नियंत्रणात स्पर्धेतील खेळांचे आयोजन करण्यात आले असून खेळ प्रकारांचा स्पर्धेत समावेश करणे अथवा वगळणे याबाबत आयोजन समितीचा निर्णय अंतिम आहे.
 
आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय व राज्यस्तरावर खेळाडूंना आपले क्रीडा नैपुण्य दाखवण्याची जास्तीत जास्त संधी प्राप्त व्हावी याकरिता अशाप्रकारच्या स्पर्धांचे आयोजन केले जाते. या स्पर्धेच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय व राज्यस्तरावरावरील खेळाडू निर्माण होतील. स्पर्धेमुळे महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यांतील युवा खेळाडूंना आपले कौशल्य दाखवण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे. या स्पर्धेमुळे महाराष्ट्रातून निश्चितच ऑलिंपिक पदक विजेते खेळाडू निर्माण होतील, असा विश्‍वास आहे.
 
Edited By -Ratnadeep Ranshoor