वीजहानी कमी करण्यासाठी महावितरण ऍक्शन मोडवर
कोल्हापूर : सध्या 50 टक्क्यांपेक्षा अधिक वीजहानी असलेल्या वाहिन्यांवरील वीज गळतीचे प्रमाण कमी करण्यासाठी ऍक्शन मोडवर येत महावितरणने मोहीम हाती घेतली आहे. सध्या महावितरणच्या 16 परिमंडलातील 230 पेक्षा जास्त वाहिन्यांवर राबविण्यात येणाऱया या मोहिमेत वीज चोरांविरुद्ध धडक कार्यवाही, नादुरुस्त मीटर बदलणे, एरियल बंच केबल्स टाकणे, मल्टी मीटर बॉक्स बसविणे, कॅपॅसिटर बसविणे आणि वीजभाराचा समतोल राखणे आदी कामे करण्यात येणार असल्याची माहिती महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी दिली आहे.
केंद्र सरकारच्या अर्थ सहाय्याने महावितरणद्वारे राबविण्यात येणार असलेल्या सुधारित वितरण क्षेत्र योजनेचे मुख्य उद्दीष्ट हे वीजहानी कमी करण्याचे असून त्या अनुषंगाने महावितरणने धडक मोहीम राबविण्याचे ठरवले आहे. ही योजना जलदगतीने राबविण्यासंदर्भात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री व ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकत्याच घेतलेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीमध्ये नियमीतपणे वीजबिल भरणाऱया ग्राहकांना चांगली सेवा मिळावी व त्यातून महावितरणची आर्थिक परिस्थिती उंचवावी यासाठी वीजहानी कमी होणे आवश्यक आहे, त्यासाठी महावितरणने योजनेची त्वरित अंमलबजावणी करावी अशा सूचना केल्या आहेत.