शुक्रवार, 24 ऑक्टोबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 5 डिसेंबर 2020 (16:12 IST)

कार्तिकी वारीतील प्रमुख कार्यक्रम मर्यादित वारकऱ्यांच्या उपस्थितीत पार पाडणार

Major events
कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी यंदाचा संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळा अर्थातच कार्तिकी वारीतील प्रमुख कार्यक्रम मर्यादित वारकऱ्यांच्या उपस्थितीत पार पाडावेत असा आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी जारी केला आहे. विशेष म्हणजे तीर्थक्षेत्र आळंदीत भाविकांची गर्दी टाळण्यासाठी खबरदारी म्हणून आळंदीसह आसपासच्या अकरा गावांत ६ ते १५ डिसेंबरपर्यंत संचारबंदी लागू करण्यात येणार आहे.
 
आळंदीत संत ज्ञानेश्वर माऊलींच्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त कार्तिकीवारी कार्तिकी वद्य अष्टमी ८ डिसेंबरपासून भरणार आहे. आषाढी वद्य एकादशी ११ डिसेंबरला तर संजिवन समाधी सोहळा दिन कार्तिक वद्य त्रयोदशी १३ डिसेंबरला आहे. यापार्श्वभूमीवर पंढरपूरातून कार्तिकी वारीसाठी श्री पांडरुंग, संत नामदेवराय, संत पुंडलिकराय या मानाच्या तीन दिंड्यांना राज्य शासनाकडून प्रत्येकी वीस वारकऱ्यांना आळंदीत प्रवेशासाठी परवानगी दिली आहे. या तिन्ही दिंड्या ८ डिसेंबरला एसटीने आळंदीत दाखल होणार आहेत. 
 
वारीकाळात कीर्तन, जागर, माऊलींच्या समाधीवरील नित्योपचार पूजा करण्यास अटी - शर्ती घालून परवानगी देण्यात आली आहे. तर यात्रा दरम्यान इंद्रायणी नदीत स्नान करण्यास बंदी घालण्यात आली आहे. माउलींच्या महाद्वारातील गुरू हैबताबाबा पायरीपूजन परंपरेप्रमाणे होणार आहे. मात्र या पूजेला फक्त ५० जणांना उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली आहे. तर इतर कार्यक्रमांना फक्त २० ते ३० जणांची उपस्थिती असणे बंधनकारक करण्यात आले आहे.