गुरूवार, 14 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 1 मार्च 2022 (07:27 IST)

नाशिकमध्ये मराठी भाषा भवन उभारणार : उदय सामंत

Marathi Bhasha Bhavan
शिक्षणाचा विस्तार सर्वत्र होऊन सर्वांना शिक्षणाची संधी उपलब्ध होण्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठांतर्गत राज्यातील विविध जिल्ह्यात उपकेंद्रांची निर्मिती करण्यात येत आहे. यानुसार नाशिक येथील उपकेंद्राचे काम करण्यासाठी त्वरित निविदा प्रक्रिया पूर्ण करून पुढील नियोजित कामास गती देण्यात यावी. तसेच यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या आवारात मराठी भाषा भवन उभारण्यात येणार आहे, असे प्रतिपादन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिले आहेत. सामनगाव येथील शासकीय तंत्रनिकेतन येथे आज सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नाशिक उपकेंद्र व शासकीय तंत्रनिकेतन याबाबतच्या आयोजित आढावा बैठकीत मंत्री श्री. सामंत बोलत होते. 
 
सामंत म्हणाले, नाशिक उपकेंद्राचे काम गतीने पूर्ण होण्यासाठी विद्यापीठाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संबंधित अधिकाऱ्यांच्या समन्वयाने कामाचा पाठपुरावा करावा, अश सूचनाही मंत्री सामंत यांनी दिल्या आहेत.
 
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या आवारात मराठी भाषा भवन उभारण्याचा निर्णय जिल्हा प्रशासन व मुक्त विद्यापीठाच्या समन्वयाने घेण्यासाठी कार्यवाही सुरू आहे. महाराष्ट्र राज्य हे सांस्कृतिक दृष्ट्या देशातील अग्रेसर राज्य आहे. त्यामुळे मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळण्याकरिता राज्य शासनामार्फत आवश्यक सर्व प्रयत्न करण्यात येत असल्याचेही मंत्री सावंत  यांनी सांगितले.
 
विद्यापीठांतर्गत असणारे महाविद्यालये व शासकीय तंत्रनिकेतन मध्ये माझी वसुंधरा अभियानांतर्गत स्वच्छता अभियान राबविण्यात यावे. यासाठी मनुष्यबळाची आवश्यकता असल्यास महिला बचत गट, महिला मंडळ व स्वयंरोजगार संस्था यांना प्राधन्य देण्यात यावे. शासकीय तंत्रनिकेतनचा विकास करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या बाबींचे प्रस्ताव सादर करावे. जिल्ह्याला क्रिडा संस्कृतीचा वारसा असल्याने शासकीय तंत्रनिकेतनच्या आवारात क्रिकेट, फुटबॉल खेळांच्या सरावासाठी मैदानाची तरतूद करून तसा प्रस्ताव सादर केल्यास शासनामार्फत निधी उपलब्ध करून देण्यात येईल, असेही उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी यावेळी सांगितले.