पर्यटनमंत्री जयकुमार रावलांची हकालपट्टी करा - मलिक
नोटबंदीच्या काळात मोदी सरकारने जाहीर केलेल्या दोन लाख काळया यादीतील कंपन्यांमधील दोन कंपन्या पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांच्या असून त्यापैकी तोरणमाळ हिल रिसॉर्ट प्रा.कंपनी MTDC च्या जागेवर आजही बेकायदा सुरु असून याप्रकरणाचे पुरावे आम्ही मुख्यमंत्र्यांना देत आहोत त्यामुळे पर्यटनमंत्र्यांचा तात्काळ राजीनामा घेऊन त्यांची मंत्रीमंडळातून हकालपट्टी करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी पत्रकार परिषदेत केली.
१९९१ सालीमध्ये एमटीडीसीकडून तोरणमाळ हिल रिसॉर्टने तोरणमाळ हिल भाडयाने घेतले. त्यानंतर १९९६ मध्ये ५ वर्षासाठी करार करण्यात आला. परंतु त्यानंतर पुन्हा २००१ ते २००६ पर्यंत १० वर्षासाठी हे रिसोर्ट भाडेकराराने घेण्यात आले, परंतु त्याचे भाडे भरण्यात आलेले नाही. उलट कंपनीने एमटीडीसीकडे ६० लाख खर्च झाल्याची मागणी केली. त्यानंतर एमटीडीसीने २०११ मध्ये सक्षम अधिकाऱ्यामार्फत भाडे भरा नाहीतर जागा खाली करा अशी नोटीस पाठवली, परंतु हे सांगण्यासाठी गेलेल्या अधिकाऱ्यांवर गावगुंडाच्या मदतीने हल्ला करण्यात आला. तोरणमाळ हिल रिसॉर्ट ही कंपनी पर्यटनमंत्री जयकुमार रावल आणि त्यांच्या कुटुंबाच्या मालकीची आहे असा आरोपही नवाब मलिक यांनी केला.