शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 31 जुलै 2020 (08:45 IST)

मिशन बिगिन अगेन अंतर्गत नवी नियमावली जारी

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊनचा कालावधी ३१ ऑगस्ट २०२० पर्यंत वाढवण्यात आला असला तरी मिशन बिगिन अगेन अंतर्गत टप्प्याटप्प्याने निर्बंध उठवण्यासाठी काही सुधारणा जाहीर करण्यात आल्या आहेत. काही सवलतींमध्ये वाढ करत राज्यातील मॉल्स आणि मार्केट कॉम्प्लेक्स काही अटींच्या अधीन राहून 5 ऑगस्ट 2020 पासून सुरू करण्यास संमती देण्यात आली आहे. 
 
या कालावधीत विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊन जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्त त्यांच्या क्षेत्रात आवश्यक निर्बंध घालू शकतील. अत्यावश्यक नसलेल्या कामांसाठी तसेच नागरिकांच्या दळणवळणास प्रतिबंध घालू शकतील. लोकांनी या काळात सामाजिक अंतर, व्यक्तिगत स्वच्छता या बाबींचे पालन करणे आवश्यक राहील. या आदेशापूर्वी संमती देण्यात आलेली सर्व अत्यावश्यक दुकाने खुली राहतील. अत्यावश्यक नसलेल्या वस्तूंचे मार्केटस्, मार्केट क्षेत्र आणि दुकाने ही सकाळी ९ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत खुली राहतील. मद्याची दुकाने ही संमती देण्यात आली असल्यास किंवा होम डिलीव्हरी (घरपोच सेवा) सुरू राहील.
 
ऑगस्ट २०२० पासून सकाळी ९ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत मॉल्स आणि मार्केट कॉम्प्लेक्सेस सुरू राहतील. या ठिकाणी असणारे थिएटर्स, फूड कोर्टस्, रेस्टॉरंटस् यांना सुरू करण्यास संमती नसेल. या मॉल्समधील रेस्टॉरंट आणि फूड कोर्टसमधील किचनला होम डिलीव्हरी (मोठ्या वाहनांमार्फत (अग्रेगेटर्स) घरपोच सुविधा) देण्यासाठी सुरू ठेवण्यास संमती असेल. अत्यावश्यक तसेच अत्यावश्यक नसलेल्या वस्तू व साहित्यांच्या ऑनलाइन खरेदीसाठी ई-कॉमर्स व्यवस्था सुरू राहील. सध्या सुरू असलेले उद्योग सुरू राहतील. संमती देण्यात आलेली सर्व सार्वजनिक तसेच खाजगी बांधकामे सुरू राहतील. संमती देण्यात आलेली सर्व मान्सूनपूर्व सार्वजनिक तसेच खासगी कामे सुरू राहतील. होम डिलीव्हरी (घरपोच सेवा) रेस्टॉरन्ट्स आणि किचन (स्वयंपाकगृहे) सुरू राहतील. ऑनलाइन दूरशिक्षण आणि त्याच्याशी संबंधित कामे सुरू राहतील. 
 
सर्व सरकारी कार्यालये (अत्यावश्यक सेवा, आरोग्य आणि वैद्यकीय, कोषागारे, आपत्ती व्यवस्थापन, पोलीस, एनआयसी, अन्न आणि नागरी पुरवठा, एफसीआय, एनवायके, महापालिका सेवा यांना वगळून) १५ टक्के कर्मचारी किंवा १५ कर्मचारी यापैकी जे जास्त असेल तितक्या क्षमतेसह सुरु राहतील. सर्व खासगी कार्यालये ही १० टक्के कर्मचारी किंवा १० कर्मचारी यापैकी जे जास्त असेल तितक्या क्षमतेसह सुरु राहतील. स्वयंरोजगाराशी संबंधित व्यवसाय उदा.  प्लंबर, इलेक्ट्रिशियन, कीटक-नियंत्रण (पेस्ट कंट्रोल) आणि तंत्रज्ञ यांची कामे सुरु राहतील.
 
हे नियम पाळणे आवश्यक
मास्कचा वापर- सार्वजनिक ठिकाणे, कार्यस्थळे या ठिकाणी तसेच प्रवासादरम्यान मास्क वापरणे बंधनकारक आहे.
 
सामाजिक अंतर पाळणे (सोशल डिस्टंसिंग) : प्रत्येक व्यक्तीने सार्वजनिक ठिकाणी वावरताना इतरांपासून किमान 6 फुटाचे (दो गज की दूरी) अंतर राखावे.
ग्राहक सुरक्षित अंतर राखतील याची दुकानदारांनी काळजी घ्यावी, दुकानांमध्ये एका वेळी 5 व्यक्तिंपेक्षा अधिक ग्राहकांना प्रवेश देऊ नये.
 
जमावाबाबतची बंधने : मोठ्या प्रमाणावर जमाव होऊ शकणारे समारंभ/सभा आदींना यापुढेही प्रतिबंध राहील. विवाह सोहळ्याला 50 पेक्षा अधिक अधिक अभ्यागतांना आमंत्रित करता येणार नाही. अंत्यसंस्कार आणि त्यासंबंधित विधींना 20 पेक्षा अधिक व्यक्तींना सहभागाची परवानगी नसेल.
 
सार्वजनिक ठिकाणी थुंकणे शिक्षापात्र असून त्यासाठी संबंधित प्राधिकरणाचे कायदे, नियम, नियमनानुसार असलेला दंड लागू राहील.
सार्वजनिक ठिकाणी मद्य, पान, तंबाखू इ. चे सेवन करण्यास प्रतिबंध राहील.