गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 4 एप्रिल 2023 (21:32 IST)

टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांची एक कोटी ८० लाखांची फसवणूक, आमदार कोकाटेनी घेतली दखल

tamatar
नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये काही दिवसांपूर्वी टोमॅटो व्यापारी शेतकऱ्यांचे सुमारे एक कोटी ऐंशी लाख रुपये घेऊन पसार झाल्याबाबत शेतकऱ्यांनी तक्रार करत बाजार समिती प्रशासनास निवेदन दिले होते.त्यानंतर तक्रारदार शेतकऱ्यांसाठी सिन्नरचे आमदार ॲड.माणिकराव कोकाटे यांनी बाजार समिती सचिवांची भेट घेतली असून प्रशासनाने योग्य ती कारवाई करण्याच्या सूचना देत शेतकऱ्यांना मदत करा, असे त्यांनी सांगितले आहे.
 
पेठ रोडवरील शरदचंद्रजी पवार मार्केट यार्ड येथे नाशिक तालुक्यासह सिन्नर, कळवण, दिंडोरी शहरालगतच्या खेड्यापाड्यातून टोमॅटो विक्रीसाठी येतात. टोमॅटो व्यापारी नौशाद फारुकी, समशाद फारुकी हे जवळपास १७९ शेतकऱ्यांचे १ कोटी ८० लाख रुपये घेऊन पसार झाले आहेत.
 
या प्रकरणात शेतकऱ्यांची बाजू मांडण्यासाठी आमदार ॲड. कोकाटे आणि समस्याग्रस्त शेतकऱ्यांनी मुख्य बाजार समितीतील सचिव अरुण काळे यांची भेट घेतली. आमदार कोकाटे आणि बाजार समिती सचिव अरूण काळे यांच्यात चर्चा होऊन ज्या व्यापाऱ्यांकडे शेतकऱ्यांचे पैसे घेणे बाकी आहे, त्या व्यापाऱ्याचे बाजार समिती आवारात असलेले गाळे विक्री करत आलेल्या पैशातून समान हिस्से करत शेतकऱ्यांना वाटप करावे असे कोकाटे यांनी सांगितले.
 
दरम्यान, यानंतर कोकाटे यांनी बाजार समिती कार्यालयातूनच पोलीस आयुक्तांना फोनवरून घडलेल्या प्रकरणाबाबत हकीकत सांगितली. त्यावर पोलीस आयुक्तांनी देखील घटनेचे गांभीर्य ओळखून संबंधित शेतकऱ्यांना तात्काळ पोलीस आयुक्तालयात पाठविण्याबाबत सांगितले असून कार्यवाही करण्यात येईल असे आश्वासन आमदार कोकाटे यांना दिले.

Edited By- Ratnadeep Ranshoor