शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 4 एप्रिल 2023 (20:29 IST)

सुप्रीम कोर्टाचा निकाल येण्याआधीची उद्धव ठाकरेंची आक्रमकता काय सांगते?

रोशनी शिंदे या उद्धव ठाकरे गटाच्या कार्यकर्तीवर हल्ल्याच्या निमित्ताने उद्धव ठाकरे विरुद्ध भाजप हा संघर्ष तीव्र झाला आहे. रोशनी शिंदे यांची हॉस्पिटलमध्ये भेट घेतल्यानंतर तसंच पोलीस आयुक्त कार्यालयाला भेट घेतल्यानंतर उद्धव यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली.
 
फडतूस, लाचार आणि लाळघोटा गृहमंत्री मिळाला आहे- उद्धव ठाकरे
“एक फडतूस गृहमंत्री आपल्याला लाभलेला आहे. अत्यंत लाचार आणि लाळघोटेपणा करणारा गृहमंत्री राज्याला मिळाला आहे. उपमुख्यमंत्रीपद मिळालं म्हणून फडणविशी करणारा माणूस मंत्री म्हणून मिरवतोय. त्यांच्या कार्यकर्त्यांवर मिंधे गटाच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केला. तरी कुठे काही हलायला तयार नाही. यांची गुंडगिरी वाढत चालली आहे”, अशा आक्रमक शब्दात उद्धव यांनी देवेंद्र यांना लक्ष्य केलं.
 
“लोकमतच्या पत्रकाराला धमकी मिळाली आहे. महिलांना मारहाण केली जात आहे. रोशनी यांना भेटलो. त्यांनी काहीही केलं नसल्याचं सांगितलं. त्यांच्याकडून माफी मागितल्याचा व्हीडिओ करण्यात आला. तोही त्यांनी करुन दिला. फडतूस गृहमंत्र्याला पदावर राहायचा अधिकार नाही. त्यांच्या घरावर काही आलं तर एसआयटी नेमतात. बाजूच्या राज्यात जाऊन अटका केल्या जातात. त्यांच्या कार्यकर्त्यांवर हल्ले झाले तर फडणविशी केली जात नाही. गुंडागर्दीचं राज्य आहे. गुंडमंत्री आहेत. गुंडांना सांभाळणारं खातं”, अशी टीका उद्धव यांनी केली.
“शिवसैनिक शांत राहिले म्हणजे सर्वोच्च न्यायालय म्हणते तसे नपुंसक नाहीत. मनात आणलं तर ठाण्यातून यांना उखडून टाकण्याची ताकद आहे. गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यायला हवा. बिनकामाच्या आयुक्तांना सांगायचं आहे की शपथेशी प्रतारणा आहे. त्यांचं निलंबन करा किंवा त्यांची बदली करा. कणखर असा आयुक्त ठाण्याला द्या. गृहमंत्री लाळघोटे नसतील, तर त्यांनी कार्यवाही करावी. ते परवा काहीतरी म्हणाले. लोक तुमच्या कारभारावरती थुंकतील. ते एवढं साचेल की लाळेने भरलेला चेहरा घेऊन लोकांसमोर जावं लागेल”, असं उद्धव म्हणाले.
 
“कोर्टाने सरकारला नपुंसक म्हटलं होतं. आता सरकारच नपुंसक म्हटल्यावर अपेक्षा कोणाकडून करायची. ठाण्याची ओळख शिवसेनेचं ठाणं अशी करुन देण्यात येते.
 
जीवाला जीव देणाऱ्या आणि महिलांचं रक्षण करणाऱ्या शिवसैनिकांचं ठाणं अशी ओळख आहे. धर्मवीर आनंद दिघेंचं ठाणं अशीही ओळख आहे. पण ही ओळख पुसून गुंडांचं ठाणं अशी ओळख झाली आहे. आजपर्यंत गँग शब्द ऐकला आहे. आता महिलांची गँग होतेय म्हटल्यावर ठाण्याचं, शहराचं, राज्याचं, देशाचं काय होणार असा प्रश्न पडला आहे”, असं उद्धव म्हणाले.
“त्यांनी काहीही करावं आणि आम्ही ऐकून घ्यावं असं चालणार नाही. तुमची गुंडगिरी आम्ही ठाण्यातून, राज्यातून फेकून देऊ शकतो. शिवसैनिक रस्त्यावर उतरले तर तोतया शिवसैनिकांची अवस्था वाईट होईल. बाळासाहेबांचे फोटो घेऊन जे नाचत आहेत त्यांना हातात भगवा आणि बाळासाहेबांचं नाव घेण्याचा अधिकार नाही. सर्वोच्च न्यायालयाने नपुंसक म्हटल्यावर महिला गुंडांकरवी हल्ला केला. यांना नपुंसकच म्हणायला हवं”, असं ते म्हणाले.
 
“आयुक्तालयात गेलो, आयुक्तच नाहीत. गुंड महिला म्हणतो कारण अशा महिला आपल्या संस्कृतीचा भाग नाहीत. रोशनी यांनी ज्यांनी हल्ला केला त्यांची नावं दिली आहेत. व्हीडिओमध्ये सगळं रेकॉर्डही झालं आहे. सगळ्यात गंभीर भाग म्हणजे रोशनी गरोदर होत्या. त्या महिलांना त्यांनी पोटावर मारु नका असं सांगितलं. पण तरीही महिला गुडांनी पोटावरही मारहाण केली.
 
हे निर्घूण काम करणारी माणसं ही ठाण्यात काय महाराष्ट्रातही राहायच्या लायकीची नाहीत. आयुक्त सरकारचा घटक आहेत. ते सरकारप्रमाणेच वागत आहेत”, असं उद्धव म्हणाले.
 
त्यांच्यापेक्षा खालची भाषा मला बोलता येते- फडणवीस
"मला त्यांच्यापेक्षा खालची भाषा बोलता येते. मी नागपूरचा आहे", असं प्रत्युत्तर गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे. उद्धव ठाकरे यांनी फडणवीसांना फडतूस, लाचार आणि लाळघोटा म्हटलं आहे.
"अडीच वर्षांचा कारभार बघितल्यानंतर नेमकं फडतूस कोणय? हे महाराष्ट्राला माहिती आहे. दोन-दोन मंत्री जेलमध्ये गेल्यानंतर राजीनामा घेऊ शकले नाहीत. त्यांच्याभोवतीच लाळ घोटत असतात.
 
जे वाझेच्या मागे लाळ घोटतात, ज्यांच्या काळात पोलीस एक्स्टॉर्शन करतात त्यांना बोलण्याचा अधिकार काय," असा सवाल फडणवीस यांनी केला.
 
"अडीच वर्षे घरात बसून राजकारण करणाऱ्यांनी आम्हांला शिकवू नये. ज्या दिवशी बोलणं सुरु करील त्या दिवशी त्यांची पळता भूई थोडी होईल. त्यांचा जो थयथयाट आहे त्याला उत्तर देण्याचं कारण नाही.
 
मोदींचे फोटो घेऊन निवडून येता आणि खुर्चीसाठी लाळ घोटता... मग खरा फडतूस कोण?
 
मी गृहमंत्री असल्याने अनेकांना अडचणी येताय. ते पाण्यात देव ठेवून बसले आहेत. पण मी गृहमंत्रिपद सोडणार नाही. जो-जो चुकीचं काम करेल त्याला जेलमध्ये टाकल्याशिवाय राहणार नाही", असं फडणवीस म्हणाले.
 
फेसबुकवरील पोस्टवरुन उद्धव ठाकरे गटाच्या कार्यकर्त्या रोशनी शिंदे आणि एकनाथ शिंदे गटाच्या महिला कार्यकर्त्या यांच्यात वाद झाला होता.
 
ठाकरे गटाच्या महिला पदाधिकारी रोशनी शिंदे या सोमवारी संध्याकाळी ऑफिसमधून घरी परतण्याच्या तयारीत होत्या. त्यावेळी ऑफिसच्या आवारात शिरुन शिवसेनेच्या शिंदे गटाच्या महिला पदाधिकाऱ्यांनी त्यांना मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
 
डॉक्टर काय म्हणाले?
डॉक्टरांच्या माहितीनुसार, "सोमवारी रात्री साडेदहाच्या दरम्यान रोशनी शिंदे यांच्या नातेवाईकांनी त्यांना सिव्हिल रुग्णालयातून माझ्या रुग्णालयात दाखल केलं. आपल्यावर काही जणांनी हल्ला केल्याचं त्यांनी सांगितलं. प्राथमिक उपचार सिव्हिल रुग्णालयात करण्यात आले. त्यानंतर पुढील उपचारांसाठी माझ्या रुग्णालयात दाखल झाल्या.
 
क्लिनिकल तपासणीत शरीरावर मारहाणीच्या हलक्या खुणा होत्या. पूर्णत: तपासणी केली असता रक्तस्राव झाल्याचं दिसत नाही. पाठीवर मुका मार आहे. काल रात्री आणि सकाळी केलेली युरिन प्रेग्नन्सी टेस्ट निगेटिव्ह आली आहे. पोटात लाथाबुक्क्यांनी मारहाण झाल्याने सोनोग्राफी करण्यात आली, तिथे रक्तस्राव नसल्याचं दिसून आलं. तसंच कुठेही फ्रॅक्चर नाही. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे."
 
रोशनी शिंदे सध्या आयसीयूमध्ये दाखल आहेत. रोशनी शिंदे यांना मुका मार लागला आहे. तसंच त्यांच्या पाठीवर माराच्या खुणा आढळल्या आहेत, अशी माहिती त्यांच्यावर उपचार करणारे डॉ. आलेगावकर यांनी सांगितले. मात्र अंतर्गत रक्तस्त्राव किंवा फ्रॅक्चर आढळलेलं नाही, असे ते यावेळी म्हणाले.
 
'आता लढायचंच' असा उद्धव यांचा निर्धार दिसतो
खेड, मालेगाव आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेल्या सभांमधून उद्धव ठाकरे यांची आक्रमकता वाढताना दिसत आहे. सत्तासंघर्षाचा निकाल सुप्रीम कोर्टानं राखून ठेवला आहे. त्यातच आता उद्धव ठाकरे आणखी आक्रमक होताना दिसत आहेत.
 
शिंदे आणि फडणवीसांना घेरण्याची एकही संधी ते सोडताना दिसत नाहीयेत. ठाण्यातल्या त्यांच्या दौऱ्याकडे त्याच दृष्टीकोनातून पाहिलं जात आहे. यासंदर्भात आम्ही काही राजकीय विश्लेषकांशी चर्चा केली.
 
"मालेगाव आणि संभाजीनगर इथे झालेल्या उद्धव ठाकरेंच्या सभांना प्रचंड प्रतिसाद मिळाला. जेवढी माणसं खुर्च्यांवर बसली होती, तेवढीच माणसं उभं राहून भाषण ऐकत होते. आतापर्यंत हिंदू-मुस्लीम संघर्ष त्यांच्या बोलण्याचा केंद्रबिंदू असे. आता त्यांनी तो मुद्दा बाजूला टाकला आहे", असं ज्येष्ठ पत्रकार संजीव उन्हाळे यांनी सांगितलं.
 
ते पुढे म्हणाले, "मुस्लीम समाज हळूहळू उद्धव ठाकरेंकडे वळला आहे. औरंगजेब नावाचा लष्करातील जवानाने जीव गमावला. त्याने देशासाठी दिलेल्या योगदानाला सलाम करायला हवा असं ते म्हणाले होते".
 
"उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्वाची व्याख्या व्यापक केली आहे. ती आताच केली आहे असं नाही, ते जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हापासूनच हे झालं. मुस्लीम मतं शिवसेनेला मिळण्याची शक्यता आहे हे त्यांना कळलं आहे", असं उन्हाळे यांना वाटतं.
 
मंगळवारी रोशनी शिंदे हल्ल्यासंदर्भात उद्धव यांच्या भूमिकेसंदर्भात विचारलं असता उन्हाळे म्हणाले, "ठाणे हा शिवसेनेचा बालेकिल्ला राहिला आहे. एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडानंतर आता त्यांच्या गडात झालेल्या मुद्यावरुन उद्धव यांनी त्यांना लक्ष्य केलं आहे. शिंदे गटाचं बंड मोडून काढण्यासाठी आता ते अशा पद्धतीने टीका करणार हे स्पष्ट झालं आहे".
 
"सर्वसाधारणपणे उद्धव ठाकरे जी भाषा बोलतात त्यापेक्षा अगदी वेगळं रुप आज पाहायला मिळालं. त्यांचा आत्मविश्वास वाढलेला स्पष्ट जाणवलं.
 
भाषणावेळीही उद्धव ठाकरे यांना वेगळी खुर्ची देण्यात आली. त्या भाषणातून जाणवलेला मुद्दा म्हणजे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांनी दुसऱ्या फळीची भूमिका स्वीकारली आहे."
"उद्धव ठाकरेच महाविकास आघाडीचं नेतृत्व करतील, आपण दुसऱ्या पातळीवर राहायचं असा पवित्रा दोन्ही पक्षांनी स्वीकारला आहे. यातूनच हेही स्पष्ट झालं आहे की या तीन पक्षांमध्ये वाद होणार नाहीत. कारण त्यांनी सामंजस्यातून हा निर्णय घेतल्याचं जाणवतं.
 
राहुल गांधींशी असलेला संपर्क स्पष्ट झाला आहे. सावरकर उद्गारांप्रकरणी शरद पवार तसंच संजय राऊत यांनी ज्या पद्धतीने चर्चा केली ते पाहता महाविकास आघाडी कार्यरत राहील हे स्पष्ट आहे", असं उन्हाळे म्हणाले.
 
"औरंगाबाद इथल्या दंगलीचा उल्लेख उद्धव ठाकरे यांनी एकदाही केला नाही. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनीही केला नाही. दंगल, हिंदू-मुस्लीम हे मुद्दे सोडून देण्याचं धोरण थेट दिसतं.
 
सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय काहीही असो, येनकेनप्रकारे आता लढायचं असा निर्धार उद्धव यांच्या बोलण्यातून, देहबोलीतून जाणवतो."
 
'दोघेही नैराश्यापोटी बोलत आहेत'
तर उद्धव ठाकरे नैराश्यापोटी सर्व बोलत असल्याचं विश्लेषण ज्येष्ठ पत्रकार प्रकाश आकोलकर यांनी केलं आहे.
 
"उद्धव ठाकरे काय किंवा देवेंद्र काय दोघेही नैराश्येतून बोलत आहेत. देवेंद्र यांच्यामुळे उद्धव ठाकरे यांचं सरकार पडलं, पक्ष फुटला त्यामुळे उद्धव यांचा देवेंद्र यांच्यावर राग आहे. एकनाथ शिंदे यांच्या खांद्यावर बंदूक ठेऊन देवेंद्र उद्धव यांच्याविरोधात लढत आहेत," असं ज्येष्ठ पत्रकार प्रकाश अकोलकर म्हणाले.
 
"दोघंही एकमेकांवर टीका करण्यासाठी वाटच बघत असतात. काही वर्षांपूर्वी एकमेकांच्या विरोधातील प्रतिस्पर्धी प्रचारादरम्यान भेटले तर गप्पा मारत. चहा पीत. आता ती संस्कृती लोप पावली आहे. पातळी सोडून एकमेकांवर टीका करतात.
 
उद्धव आज जे बोलले ती शिवसेनेची भाषा आहे. दुसरीकडे देवेंद्र यांच्याकडे परिपक्व नेता म्हणून पाहिलं जातं. ते परिपक्व असते तर त्यांनी उद्धव यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलं असतं. पण त्यांनी तातडीने प्रत्युत्तर दिलं. या दोघांना, पक्षांना जनतेच्या प्रश्नांचं काहीच पडलेलं नाही."

Published By- Priya Dixit