मोदी सरकार क्रूर ब्रिटीश राजवटीप्रमाणे; उत्तर प्रदेश हिंसाचारप्रकरणी संजय राऊतांचा हल्लाबोल!
उत्तर प्रदेशातील खेरी जिल्ह्यातील टिकोनिया येथे शेतकरी आंदोलनादरम्यान, झालेल्या हिंसाचारात ८ जणांचा मृत्यू झाला असून, त्यामध्ये ४ शेतकरी असल्याने केंद्र सरकारविरोधात विरोधकांकडून टीकेची झोड उठवून दिली जात आहे. शिवसेना नेते तथा खासदार संजय राऊत यांनी देखील केंद्रातील मोदी सरकारवर जोरदार हल्ला चढविला आहे. त्यांनी म्हटलं की, आज उत्तर प्रदेशमध्ये जे सुरु आहे त्याविरोधात कोणी काही बोलणार आहे की नाही?, असा प्रश्न उपस्थित करत सध्या शेतकऱ्यांविरोधात सुरु असणारी क्रूर वागणूक हे भाजपाचं अधिकृत धोरण आहे का?, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. त्याचबरोबर मोदी सरकारची तुलना ब्रिटीश राजवटीशी करताना क्रांतीकारक बाबू गेनू यांचाही उल्लेख केला.
संजय राऊत म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी भाषणात तर शेतकऱ्यांबद्दल तर फार बोलत असतात, असं सांगत उत्तर प्रदेशमध्ये जो प्रकार घडला तो बाबू गेनू यांच्यावर ब्रिटीशांनी ट्रक चालवल्याच्या घटनेची आठवण करुन देणारा असल्याचं राऊत यांनी म्हटलं आहे. त्याचप्रमाणे, आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांविरोधात ही क्रूर वागणूक का दिली जात आहे?, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केलाय. शेतकरी देशद्रोही वाटले म्हणून अशी क्रूर कारवाई केली का?, असा प्रश्नही राऊतांनी विचारलाय.
उत्तर प्रदेशमध्ये घडलेल्या या घटनेमुळे देशभरातील शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट असल्याचंही राऊत म्हणाले आहेत. तसेच घटनस्थळी विरोधी पक्षातील नेत्यांना जाण्यास बंदी घालण्यात आल्यावरुनही राऊत यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधलाय. विरोधी पक्षाला तिथे जायला बंदी घातली आहे, ही कोणती लोकशाही आहे? असा प्रश्न राऊत यांनी उपस्थित केलाय. सध्या उत्तर प्रदेशातील या घटनेमुळे संपूर्ण देशातील वातावरण तापले असून, केंद्र सरकारवर टीकेची झोड उठवून दिली जात आहे.