मुंबईला अतिदक्षेचा इशारा, रेल्वे सुरक्षा व्यवस्थेत वाढ
आगामी तीन महिन्यांत मुंबईतील गर्दीच्या रेल्वे स्थानकांवर दहशतवादी हल्ल्याचा इशारा भारताच्या गुप्तचर संघटनांनी दिला आहे. त्यामुळे रेल्वेने सुरक्षा व्यवस्थेत वाढ करत अतिदक्षेचा इशारा दिला. त्यानुसार सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगड समुद्र किनाऱ्यावरील सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात हाय अलर्ट असल्याने पोलिस यंत्रणा सतर्क आहे. सुरक्षाव्यवस्थेत वाढ करण्यासह संशयास्पद व्यक्तींना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी करा, असे आदेश रेल्वे पोलिस आणि रेल्वे सुरक्षा बलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना मिळाले आहेत.
मुंबईची जीवनवाहिनी असलेल्या लोकलमधून दररोज लाखो प्रवासी प्रवास करतात. दहशतवादी हल्ल्याबाबत गुप्तचर संघटनेने माहिती दिल्यानंतर रेल्वे मंडळाचे अध्यक्ष विनोद कुमार यादव यांनी रेल्वे पोलिस आणि रेल्वे सुरक्षा बलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना बुधवारी सुरक्षा व्यवस्था कडक करण्याचे आदेश दिले आहेत. सुरक्षा व्यवस्थेत वाढ करा, संशयास्पद व्यक्तींना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी करा, रेल्वे स्थानकांवर विशेष करून लांबपल्ल्याच्या मेल-एक्स्प्रेसमध्ये शोध मोहीम हाती घेण्याच्या सूचना बुधवारी दिल्या. रेल्वे पोलिस आणि रेल्वे सुरक्षा बलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.