शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 16 फेब्रुवारी 2019 (16:43 IST)

नालासोपारा रेल्वे स्थानकावर जवळपास पाच तास आंदोलन

पुलवामा दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ नालासोपारा रेल्वे स्थानकावर जवळपास पाच तास आंदोलन करण्यात आलं. सकाळी 8 ते दुपारी 1 पर्यंत जवळपास दहा हजाराच्या जमावाने रेल्वे रोखून धरली. संतप्त जमाव हाताबाहेर जात असल्याने पोलिसांना लाठीमार करावा लागला. या लाठीहल्ल्यानंतर दुपारी दीडच्या सुमारास पहिली लोकल रेल्वे धावली. सध्या दोन्ही बाजूची रेल्वे वाहतूक धीम्या गतीने सुरु आहे. वसई, विरार, नालासोपारा परिसरात रिक्षा आणि बस पूर्णपणे ठप्प आहे. त्यामुळे सर्व प्रवासी रेल्वे स्टेशनवर अडकून राहिले.
 
सकाळी 8 च्या सुमारास नालासोपारा रेल्वे स्टेशनवर मोजक्याच लोकांनी आंदोलनाला सुरुवात झाली. हळूहळू काही लोक या आंदोलकांमध्ये जाऊन मिळू लागले. आंदोलकांची संख्या हळूहळू वाढू लागली. त्यामुळे आंदोलक थेट ट्रॅकवर उतरून त्यांनी रेल्वे रोखून धरली. रेल्वेच पुढे जाऊ न दिल्याने स्टेशनवरील गर्दी तुफान वाढली. त्यातच घोषणाबाजी सुरु झाली. यावेळी पोलिसांनी आंदोलकांना ट्रॅकवरुन हटवण्याचा प्रयत्न केला,  मात्र जमावाच्या घोषणा चालूच राहिल्या. दुपारी एकच्या सुमारास जवळपास दहा हजरांवर जमावाची संख्या पोहोचली. जमाव हळूहळू हाताबाहेर जाऊ लागला. तसंच ट्रेनचा खोळंबा झाल्याने प्रवाशीही अडकून पडले. कुणाला नोकरीला, कुणाला खासगी कार्यक्रमांना, कुणाला लग्नाला, कुणाला रुग्णालयात जायचं होतं. मात्र रेल्वे रोखल्यामुळे सर्वकाही ठप्प होतं. दरम्यान जमाव हाताबाहेर जात असल्याचं पाहून पोलिसांनी आक्रमक पवित्रा घेत, आंदोलकांवर लाठीचार्ज केला.