शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: मुंबई , सोमवार, 18 फेब्रुवारी 2019 (11:15 IST)

युतीची अधिकृत घोषणा आज होण्याची शक्यता

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आज (सोमवारी) मुंबईत येत आहेत. शहा व शिवसेना पक्षप्रुख उद्धव ठाकरे हे बीकेसी एमसीए येथे सायंकाळी सहा वाजता पत्रकार परिषद घेणार असल्याची अधिकृत माहिती मिळाली आहे.
 
लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकांच्या युतीतील जागा वाटपाचा ठरलेला अंतिम फॉर्म्युला सोमवारी पत्रकार परिषदेत जाहीर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात दोन दिवसांपूर्वीच रात्री युतीबाबत महत्त्वाची बैठक झाली. यावेळी शिवसेनेकडून शिवसेना नेते व राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई व भाजपाकडून महसूलमंत्री चंद्रकांत पाटील उपस्थित होते. या बैठकीची गुप्तता ठेवण्यात आली होती.
 
या बैठकीत लोकसभा व विधानसभा निवडणुका युती एकत्रित लढण्याचे ठरले असून या दोन्ही निवडणुकीचा फॉर्म्युलादेखील ठरला, अशी माहिती सूत्रांनी दिली.
 
राज्यात लोकसभेसाठी दोन्ही पक्ष 24-24 जागा लढणार असून विधानसभेच्या 145 जागा भाजप लढेल, तर शिवसेनेला 143 जागा दिल्या जातील हा फॉर्म्युला या बैठकीत ठरला असल्याची माहिती सूत्रांनी दिली. तर लोकसभेची पालघरची जागा शिवसेनेला देण्याला भाजपने अखेर अनुकूलता दाखवली आहे. तसेच शिवसेनेच्या काही महत्त्वाच्या मागण्या देखील भाजपने मान्य केल्याचे या बैठकीत ठरल्याचे समजते.